ताज्या बातम्या

भेगाळलेली जमीन अन करपलेले जीवन

दुष्काळाचा राक्षस सातत्याने मानगुटीवर बसलेला असतो. मराठवाड्याला दुष्काळ काही नवा नाही. दुष्काळाची नुसती चर्चा होते. तात्पुरत्या उपाय योजना आखून करोडो रुपयाचा खर्च केला जातो. दुष्काळाची कायमची कीड बाजुला काढली जात नाही. दुष्काळाचं आव्हान पेलण्याची ताकद आजच्या राज्यकर्त्यांत नाही ही मोठी शोकांतिका आहे. देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं. तंत्रज्ञानातून अशक्य बाब शक्य करता येते, पण तितकी मानसीकता आपली राहिली नाही. जी संकटे वेळोवेळी समोर येतात त्या संकटावर मात करण्याची ताकद असली पाहिजे. दुष्काळात झोकून देणारी माणसं खुप आहेत. त्यातून काही आदर्श घेतला जात नाही. अनेक समाजसेवक उभं आयुष्य माणसासाठी खर्च करतात. त्यातून काही तरी बोध घेतला पाहिजे. तलावातील गाळ काढणारे समाजसेवक असतील किंवा जमीनीत पाणी मुरवण्यासाठी धडपड करणारे जलतज्ञ असतील. यांची धडपण समजून घेतली जात नाही. दुष्काळाच्या भयानतेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. खाण्याचा प्रश्‍न नाही आज फक्त पाण्याचा प्रश्‍न आहे. पाणी आणायचं कुठून हाच प्रश्‍न सर्वासमोर आ वासून उभा आहे. 
सत्ताधार्‍यांनी आज पर्यंत काय केलं? 
शासन आणि प्रशासनामुळे समाज विकासाकडे वाटचाल करत असतो. आज पर्यंत अनेक राज्यकर्ते आले आणि गेेले. या राज्यकर्त्यांनी दुष्काळ हाटवण्यासाठी नेमकं काय केलं हा प्रश्‍नच आहे. सत्ता ही फक्त भोगण्यासाठी नसते. त्या सत्तेतून नवा समाज घडवायचा असतो. राज्य संपन्नतेकडे घेवून जायचे असते. राज्यकर्ते फक्त सत्तेचे लालची झाले. सत्ता कशी मिळेल आणि त्यातून आपलं भलं कसं होईल. असाच विचार केला जातो. सत्तर वर्षानंतर ही पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो ही अभिमानाची बाब थोडीच आहे. सत्तर वर्षात राज्यकर्त्यांनी फक्त खुर्च्याच उबवल्या का? सत्तेचा बाजार झाला नाही पाहिजे. सत्ता विकासाचा केंद्र बिंदू ठरली पाहिजे. विकास हाच सत्ताधार्‍यांचा अजेंडा असला पाहिजे तेव्हा कुठं राज्य विकासाचे मॉडेल म्हणुन पुढे येतं. दुष्काळाची जबाबदारी आज पर्यंत भोगलेल्या सर्वच सत्ताधार्‍यांची आहे. त्याचं पाप आजच्या जनतेला भोगावं लागतं हे विसरुन चालणार नाही. सिंचन वाढवणं हे सत्ताधार्‍याचं कर्तव्य आहे. पण सिंचनात आज पर्यंत कोटयावधी रुपयाचा अपहार झाला. सिंचनाच्या अपहाराची चर्चा होते. सिंचनात मलाई खाणार्‍यावर कारवाई करण्याचे इशारे दिले जातात. प्रत्यक्षात काहीच होत नाही. सिंचनात भ्रष्टाचार करणारे सगळ्याच पक्षाचे हात आहेत. सिंचन वाढवावे असे पुढार्‍यांना वाटतच नाही. याचं कारण समाजाबद्दल पुढार्‍यांना तितकी कणव राहिली नाही.
पाहणी करुन प्रश्‍न सुटत नसतात 
दुष्काळ पडला की, दुष्काळी दौरे सुरु असतात. त्या दौर्‍यातून काहीच निष्पन्न होत नाही. यापुर्वी २०१२ ते २०१३ व त्यापुर्वी दुष्काळ पडला होता. त्यावेळी अनेक सत्ताधारी पुढारी, केंद्रीय पथक दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येत होते. कुठं तरी रस्त्याच्या कडेला थांबून शेतीतील बांध पाहत होते किंवा एखादी विहीर नाही तर कोरडा तलाव पाहत होते. अशा पाहणीतून नेमकं काय दिसत होतं हे पाहणी करणांनाच माहित?. यंदाही भीषण दुष्काळ पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यालयात बसून राज्याच्या दुष्काळाचा आढावा घेत असतात. काही मंत्री बांधावर जावून पाहणी दौरे आयोजित करतात आणि कुठं तरी एखाद्या व्यक्तीला बोलून चर्चा करत असतात आणि म्हणत असतात की, दुष्काळ भयान आहे. त्यावर वेळीच उपाय योजना केल्या जातील, लोकांनी घाबरुन जावू नये, सरकार त्यांच्या पाठीशी आहे. अशा अर्थ नसलेल्या गप्पा सध्या ऐकायला मिळतात. फक्त गप्पा मारुन प्रश्‍न सुटत असतात का? राज्यात गेल्या पाच महिन्यात पाण्याचे कित्येक बळी गेले. याचं सरकारला काही देणं-घेणं नाही. टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातो पण त्या टँकरमधलं पाणी शुध्द आहे का हे कधी मुख्यमंत्र्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी बघितले आहे का? जिथं पाणी शुध्द पाजलं जात नाही तिथं विकास केल्याचा डांगोरा पिटला जातो आणि आम्ही दुष्काळी जनतेच्या पाठीशी असल्याच्या खोटया बाता मारल्या जातात म्हणजे सत्ताधारी लोकांना कसे मुर्ख बनवतात हे यातून दिसून येतं. 
शेतकर्‍याचं मरण थांबेना 
दुष्काळात शेतकर्‍याचं मरण येतं. दुष्काळ पडला म्हणुन कुणी उद्योगपती रस्त्यावर आला असं घडलं नाही किंवा एखाद्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली असं कधी होत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे हे रोजच घडत आहे. राज्यात दररोज चार शेतकरी आत्महत्या करतात तरी कुणाला काहीच वाटत नाही. यंदा शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला. पाच वर्षापुर्वी सध्याच्या भाजपावाल्यांनी शेतकर्‍यासाठी काय-काय घोेषणा केल्या होत्या. त्या घोषणा त्यांच्या आज लक्षात ही नसेल. यंदाच्या दुष्काळामुळे शेतकरी हातबल झाला. नेमकं जगावं कसं हेच त्यांना कळत नाही. गेल्या पाच महिन्यात बीड जिल्हयातील ७० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्याचा आकडा तर शेकडो मध्ये आहे. घरात पैसा नाही. मुलांचा सांभाळ कसा करायचा, मुलींचे लग्न, या चिंतेतून शेतकरी हातबल होवून टोकाचं पाऊल उचलून तो आपले जीवन संपवत आहे. कुठल्याही सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांचे कधी आश्रू पुसले नाहीत, किंवा त्यांच्या मदतीला धावून गेले नाही. शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा त्याला सरकारी मदत दिली जाते. मदतीला पात्र ठरवण्यासाठी प्रचंड निकष लावण्यात आलेले आहेत. मेल्यानंतर मदत देण्याऐवजी त्याने आत्महत्याच करु नये असे काही धोरण राबवले जात नाही. शेतकर्‍याचं मरण थांबलं तरच शेतीला चांगले दिवस येतील नाही तर एक दिवस शेती करायला कुणी पुढे येणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. 
पाण्यासाठी धावपळ 
यावर्षीच्या दुष्काळात पाण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल होवू लागले. जो तो पाण्यासाठीच धडपड करत असतांना दिसतो. शहराच्या ठिकाणी थोडं बरं असतं. कारण नगर पालिका पाणी पुरवठा करते पण ग्रामीण भागातील लोकांना पाण्याचं वेडच लागल्यासारखी परस्थिती निर्माण झाली. सगळे कामे बाजुला ठेवून पाण्याचा शोध घ्यावा लागतो. टँकर येणार म्हणुन लोक गावाला जात नाहीत किंवा लग्नास जात नाहीत इतकी वाईट अवस्था निर्माण झाली. एकदा पाण्याचं टँकर येवून गेलं की, ते पंधरा दिवस येत नाही म्हणुन लोक पाण्याची वाट पाहत दारातच बसत असतात. वाळवंटी भागात जशी अवस्था असते तशीच अवस्था या दुष्काळात मराठवाड्याची झाली. विहीर, बोअर, तलावे कोरडे पडले आहेत. काही ठरावीक विहीरींना पाणी आहे. जिथं पाणी आहे. तिथून पाण्याचा पुरवठा केला जातो. बीड जिल्हयातील प्रत्येक गावात पाण्यासाठी लोकांनी आप-आपल्या दारासमोर टाक्या ठेवलेल्या आहेत. टँकरवरच लोकांना अवलंबून राहावे लागते. ज्यांना टँकरद्वारे पाणी मिळत नाही अशा लोकांना दुरवरुन पाणी आणावे लागते. डोंगर दर्‍यातील लोकांचे पाण्यासाठी जास्त हाल होतात. कारण त्या ठिकाणी टँकर जात नाही. जवळ कुठं पाणी नाही म्हणुन डोंगराळ भागातील लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांनी केवळ पाणी नाही म्हणुन शहराकडे धाव घेतली. रोजगारासाठी स्थलांतर नेहमीच होतं पण पाण्यासाठी स्थालांतर हे पहिल्यांदाच होत आहे. 
हाताश आणि निराश 
पाऊस चांगला असेल तर सगळं काही ठिक असतं पण पाऊस नसेल तर जीवनमान पुर्णंता बदलून जातं. ७० टक्के लोकाचं जीवन फक्त शेतीवर अवलंबून आहे. शेती पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी शेतीत काही पिकलं नाही. त्यामुळे माणसं अगदी हाताश आणि निराश आहेत. गावात रोजगाराचं साधन नाही. शहराच्या ठिकाणी जावं तर तिथं रोजगार मिळेल हे सांगता येत नाही पण अनेक कुटूंबानी जगण्यासाठी इतर ठिकाणी स्थलांतर केले. जे गावात आहे ते रोज बोटावर दिवस मोजत असतात. हा दुष्काळ कधी सरेल आणि एकदाचा चांगला पाऊस कधी पडेल याची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. गेली तीन ते चार महिने कठीण गेले. सध्याचा मे महिना खडतर जात आहे. यंदा तरी पाऊस चांगला पडेल की नाही याची चिंता शेतकर्‍यांना लागून आहे. जनावरासाठी छावव्या सुरु केल्या. त्यात शेतकर्‍यांची जनावरे कशी-बसी जगतात पण माणसाचं जगणं अवघड होऊन बसलं. दुष्काळाने शेतकर्‍याचं जीवन करपून गेलं. शेतात पाहिलं तर सगळीकडे भकास आणि भयान दिसतं. सर्वत्र भेगाळलेली जमीन दिसते. पाण्याचा कुठं थेंब दिसत नाही. गावात उदासीनता वाटते. प्रत्येकाच्या दारात आणि घरात दुष्काळाने निराशा आणली ही निराशा नेमकी कधी दुर होईल याची वाट शेतकरी पाहत आहे. दुष्काळाने होत्याचं नव्हतं होतं. दुष्काळ हा काळ बनून समोर येतो. तो माणुस उध्दवस्त करतो, समाज जीवन बदलून टाकतो. ज्या दुष्काळाने माणूस होरपाळून जातो तो दुष्काळ कधीच येवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते

अधिक माहिती: beed

Best Reader's Review