पेटवा मशाली

पेटवा मशाली 

गणेश सावंत
लोका हो, निट बघा या फोटोकडे. हा फोटो आरडून ओरडून आयुष्याचे भविष्य सांगतोय. कधी काळी दूध-दह्याच्या गंगा वाहणार्‍या देशाची आणि रांगड्या महाराष्ट्र प्रदेशाची व्यथा सांगतोय. जिथं पाणी हे जिवन सांगणारे तुम्ही-आम्ही मात्र पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही परिस्थिती ओढावून घेतल्याचेही तो फोटो आक्रोश करून सांगतोय. आज एका वर्तमानपत्रात हा फोटो आला आणि भविष्यात या महाराष्ट्राचे आणि खासकरून मराठवाड्याचे वाळवंट होणार हे उघड सत्य डोळ्यांसमोर आले. वाळवंटाचे ते भयावह स्वरुप मनोमनी रेखाटले अन् आमच्या अंगाची नुसती लाही लाही झाली. जर मग वाळवंट दृश्य परिस्थिती ओढावलीच तर मग काय होईल? सदरचा फोटो नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी भागातील आहे. त्याठिकाणी आदिवासी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी नुसता पायपिटा करावा लागत नाही तर एका विहिरीत पाण्याचा झरा आहे आणि त्या झर्‍याच्या आधारे घागर दोन घागर पाणी कधी जमी होईल आणि ते कधी भरावं लागेल हेही सांगता येत नाही. रात्रीच्या किर्र अंंधारात एक मुलगा हातात टेंभा पेटवतो. मशाल पेटवून तो उभा राहतो आणि त्या मशालीच्या उजेडात हे आदिवासी लोक ग्लासाने अथवा तांब्याने घागरीत पाणी भरतात आणि आपली तहान भागवितात. ही लांबची गोष्ट नाही ही महाराष्ट्रातली गोष्ट आहे. एका फोटोने आणि तिथल्या परिस्थितीने चिंता आणि चिता समोर मांडली असेल तर मराठवाड्यातून असे कित्येक तरी गाव आहेत जिथं पाण्यासाठी यापेक्षाही भयान परिस्थिती पहावयास मिळते. ही परिस्थिती कोणी निर्माण केली ? तर याचं उत्तर सरळ साध्या सोप्या भाषेत सरकरच्या निकम्मेपणाने असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचासारखा महामूर्ख कोणीच नसेल. सरकारबरोबर या परिस्थितीला तुम्ही-आम्हीही तेवढेच जबाबदार आहोत. हे आता प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे आणि जबाबदारी स्वीकारून पर्यावरणाकडे आता लक्षच द्यायला हवे. 
मराठवाड्याचा दुष्काळवाडा 
   स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालविलेल्या लोकशाहीच्या राज्यात स्वातंत्र्याला स्वैराचाराची झालर तुम्ही-आम्ही कधी लावून घेतली अन् या स्वैराचारात मदमस्त होत भौतिक सुखासाठी पर्यावरणाची कत्तल तुम्ही आम्ही सर्रासपणे करत गेलो. त्याचा फटका २०१२ पासून तुम्हा-आम्हाला बसत राहिला. मराठवाडा हा तसा सुरुवातीपासून मागास भाग. सिंचनापासून कोसो दूर असलेला आणि सरकारी बाबुंच्या मनमानीसह सत्ताधार्‍यांनी केवळ मतासाठी वापर केलेला मराठवाडा पाहितला आणि त्यातली आजची स्थिती पाहितली तर आज मराठवाडा नाही तर दुष्काळवाडा तुम्हा-आम्हाला पहायला मिळतय. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ३३ ते ३५ कोटींचा देश असलेला भारत जेंव्हा आज १३५ कोटींचा होऊन बसतो तेव्हा दुधा-दह्याच्या आणि तुपाच्या गंगा सोडा पाण्याच्या गंगा आटल्या जातात हे त्रिवार सत्य कोणीही नाकारणार नाही, परंतु अशा परिस्थितीत जशी आपण अन्न-धान्यापासून खानपाणापर्यंत वाढ कशी होईल याकडे लक्ष दिलं तसं पाण्याची वाढ कशी होईल याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. परिणामी वाढत्या सिमेंटच्या जंगलाने गाव ते गाव आणि शहर ते शहर आपल्या कवेत घेतलं. माणसाला आणि प्राणीमात्राला ऑक्सीजन देणार्‍या वृक्षांची जंगले मात्र इथे नेस्तनाबूत करण्यात आले, जमीनदोस्त करण्यात आले आणि त्यातून दुष्काळासारख्या महाभयंकर राक्षसाने जन्म घेतला. जेंव्हा दुष्काळाच्या राक्षसाचा जन्म झाला त्याच वेळी कोणीतरी श्रीकृष्ण होऊन त्याचा खुर्दा केला असता, त्याला पाताळात गाढले असते तर आज ही वेळ आली नसती. श्रीकृष्ण होणे म्हणजे बासुरी वाजवणे नव्हे, सुदर्शनचक्र चालवणे म्हणजे नव्हे, गोपीयांना सतावणे म्हणजे नव्हे, माखन चोरणे म्हणजे नव्हे, तर श्रीकृष्णा होणे म्हणजे संरक्षण करणे होय आणि ते संरक्षण वृक्षांचे झाले असते तर आज ही परिस्थिती ओढावली नसती. मशाली पेटवून पाणी खरडून घेण्याची वेळ आली नसती, मराठवाडा दुष्काळवाडा झाला नसता. आता जसे पाणी भरण्यासाठी मशाली पेटवत आहात तशा क्रांतीच्या मशाली वृक्षारोपणासाठी, पाणी साठवण्यासाठी पेटवाव्याच लागतील. म्हणून आम्ही पुन्हा एकदा म्हणतो,
पेटवा मशाली
  आणि उठा दुष्काळवाडा होऊन बसलेल्या मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी भविष्यात मराठवाड्याचं वाळवंट होऊ नये. विदर्भाचं वाळवंट होऊ नये म्हणून आजपासून वृक्षारोपण करण्याबरोबर त्याचं जतन करण्याचं धारिष्ट्य आता दाखवावं लागेल. सरकार काय करतय, ही सरकारची जबाबदारी आहे, असं म्हणून हात झटकण्यापेक्षा ही तुमची-आमची जबाबदारी आहे हे ध्यानात घेऊन वृक्ष जगवण्याची जबाबदारी आता स्वीकारावीच लागेल. तुमच्या मुलांना भविष्यात काही कमवून ठेवायचं असेल तर त्यांना पर्यावरण कमवून ठेवा. तेव्हा ते आपलं सुरक्षित जीवन जगू शकतील. पैशाच्या मागे लागलेल्या आणि त्या पैशातून भौतिक सुखाचा आनंद घेणार्‍या तथाकथीतांनो तुमच्या पिढीला तो आनंद मिळेलच  हे सांगणे कठीण आहे. आमचे पंजोबा नदीमध्ये अंघोळ करायचे, पाणी प्यायचे, आमचे आजोबा विहिरीमध्ये अंघोळ करायचे, पाणी प्यायचे, आमचा बाप नळाचं पाणी प्यायचा आणि आता आम्ही बाटलीचं पाणी पितोय, उद्या तुमचे -आमचे मुलं चमच्याने पाणी पिणार का? हा सवाल वरचा फोटो पाहितल्यानंतर प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही. तसं तर आम्ही पाण्याचं महत्त्व गेल्या दशकातच जाणलं आणि स्वत:हून पाण्यावर काम काम करायला सुरुवात केली, परंतु ही सुरुवात एक क्रांती व्हावी, प्रत्येक माणसाला पाण्याचं आणि वृक्षांचं महत्त्व कळावं यासाठी आता प्रत्येकाने वरचा फोटो पाहून काही काळ चिंतन करणे गरजेचे आहे. त्या चिंतनातून जेव्हा भविष्यात स्वत:च्या आजुबाजुला वाळवंट दिसेल तेव्हा त्याचं महत्त्व पटेल. मराठवाड्यामध्ये वृक्षतोडीबाबत वेगळा कायदा आहे, अध्यादेश आहे. तरीही वृक्षतोड सर्रासपणे होतेय. इथं मात्र प्रशासनातले अधिकारी आणि सत्ताधारी दुर्लक्ष करतात हा त्यांचा दोष आहे. माणूस म्हणून शासन-प्रशासन व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी सामाजिक बांधिलकी म्हणण्यापेक्षा आपल्या भविष्याचा वेध म्हणून तरी वृक्षतोड तात्काळ थांबवायला हवी. राक्षसी वृत्तीच्या वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी कायद्याचे बंधने घालून दोषींवर गुन्हे दाखल करायला हवेत. इथं फळाचं वृक्ष तोडण्यासाठी तहसीलदार किंवा मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते, तरीसुद्धा वृक्षतोड होत असेल तर तो दोष केवळ शासन-प्रशासन व्यवस्थेचा म्हणावा लागेल. म्हणून म्हणतो डोळ्यांवरचे झापड्या काढा, आपला परिसर वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल तर आजच पर्यावरणाला महत्त्व द्या आणि पेटवायच्याच असतील मशाली तर त्या वृक्षरोपणासाठी पेटवा, पाणी अडवण्यासाठी वाचवा. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review