विशेष संपादकिय...-गणेश सावंत-पर्रिकरांचं सरण, भाजपाचं सत्ताकारण  मरण एकच 

विशेष संपादकिय...

-गणेश सावंत

एकीकडे मनोहर पर्रिकरांचं सरण रचलं जात होतं, अनेकांचे डोळे पानावले गेले होते, आस्वांचा बांध फुटला जात होता, कंठ दाटून आलेले होते, देशात दुखवटा पाळला गेला होता. देशाचा ध्वज तिरंगा अर्ध्यावरती आणला गेला होता. स्मशानात मनोहर पर्रिकरांचा पार्थीवदेह सरणावर ठेवला जाणार होता, ही स्मशानातली आणि गोव्यातली स्थिती होती तर दुसरीकडे मात्र भाजपाचे नेते मुख्यमंत्री कोणाला करायचं? इथली सत्ता आपल्या ताब्यात कशी ठेवाची याच्या कामाला लागले होते. बहुमत तर नाही, सत्ता तर ठेवायची, मग करायचं काय? फोडाफोडी, तोडातोडी आणि जोडाजोडीचे काम रविवारच्या मध्यरात्रीपासून नितीन गडकरींनी सुरू ठेवले होते तर त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हेही गोव्यात जावून पोहचले होते. हे सर्व सोमवारचं राजकीय चित्र पाहितलं आणि आमच्या मनात आलं भाजपाला सत्तेपुढे सरण काय अन् मरण काय, शेतकरी काय आणि मुख्यमंत्री काय, कष्टकरी काय अन् कामगार काय याचं काही देणंघेणं नाही. भाजपाला देणेघेणं फक्त सत्तेचं. हेच यातून स्पष्ट झालं. राजकारण हे किती निष्ठूर असतं, किती अमानूष असतं हे आज पुन्हा देशानेच नव्हे उभ्या जगाने पाहितलं. मध्यरात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला भाजपाने मुख्यमंत्री पदाची शपथ प्रमोद सावंतांना देऊन टाकली. दोन-दोन उमुख्यमंत्री केले अन् भाजपाने माणसापेक्षा, व्यक्तीपेक्षा त्याच्या कर्तव्य-कर्मापेक्षा सत्ता हीच महत्त्वाची. हे उभ्या जगाला सांगून टाकले. आज सकाळी जेंव्हा आमच्या एका मित्राने सुरेश भटांची कविता आवर्जून मला ऐकवली तेव्हा मलाही 
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, 
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, 
ही दुनिया पाषाणाची, बोलून बदलली नाही, 
मी बहर इथे शब्दाचे नुसतेच उधळले होते. 
मनोहर पर्रिकरांची चिता पेटवली नसेल तर इकडे पेटीची भाषा भाजपेयींनी केली. चितेला अग्निडाग दिला नसेल तर इकडे सत्तेसाठी आमदार जोडाजोडीचे डाग दिले जात होते. किती हे दुर्दैव. ज्या माणसाने उभं आयुष्य ज्या पक्षासाठी घालवलं त्या पक्षाने त्याच्या मृत्यूनंतर त्याची 
चिता शांत होण्याचीही 
वाट पाहितली नाही. मनोहर पर्रिकरांचं निधन झालं अन् भाजप अल्पमतात आलं. आता इथं सत्तांतर होईल हीच भीती भाजपेयींना वाटू लागली. मनोहर पर्रिकर मृत्यूच्या दाढेत असताना सभागृहात यायचे, काम करायचे, लोकांपर्यंत जायचे, नाकाला नळी लावलेली आणि कमरेला पिशवी असलेले पर्रिकर हाऊ इज द जोश म्हणत स्वत:मध्ये आणि उपस्थितांमध्ये ऊर्जा निर्माण करायचे. त्या माणसाच्या अंत्ययात्रेची एकीकडे तयारी केली जात होती तर दुसरीकडे भाजपाचे नेते मित्र पक्षांसोबत चर्चेचे गुर्‍हाळ गात होते. कला अकादमीमध्ये पर्रिकरांचा पार्थीव देह अंत्यसंस्कारासाठी ठेवला गेला होता. भाजपाच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्याने तिथं जातीने पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित राहणं गरजेचं होतं. मात्र तसं झाल्याचे दिसून आले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी अडीच वाजता गोव्यात पोहचले. गोवा कला दालनात त्यांनी पर्रिकरांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले. पर्रिकरांचे पुत्र उत्पल आणि अभिजीत, भाऊ अवधूत यांचे सांत्वन केले. पंतप्रधान इकडे पर्रिकरांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत होते तर त्याच वेळी भाजपाचे नेते नितीन गडकरी हे मित्र पक्षांचे मन वळवत होते, सव्वा चार वाजता पर्रिकरांची अंत्ययात्रा सुरू झाली, त्याच वेळी भाजपाच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी घेण्याचा घाट घातला जात होता. दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान मोदींसह संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यासह आदी बड्या नेत्यांनी गोवा सोडले, दिल्लीकडे रवाना झाले मात्र अमित शहा, नितीन गडकरीसारखे अन्य नेते मनोहर पर्रिकरांच्या चितेची राख शांत होण्याची वाट पाहू शकले नाही अन् रात्री पावणेदोनव वाजता गोवा ताब्यात घेतला. स्वत:च्या माणसाला मुख्यमंत्रीपदी बसवलं. 
भाजपाचं एकच धोरण 
मरण असो वा सरण 
आजपर्यंत आम्हाला सरणावर गेलेल्या शेतकर्‍याच्या मरणाचं सुख-दु:ख भाजपवाल्यांना नाही, असं वाटायचं मात्र आता तर भाजपाला केवळ सत्ता पाहिजे, घरातला माणूस मृत्यूमुखी पडला तरी त्याच्या मरणाचं सुतक घेण्याची तसदी आमच्या भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना घेता आलेली नाही. ‘मढे झाकुनी करतेय पेरणी,’ हे बळीराजाचं कर्तव्य कर्म परंतु मढे झाकून अथवा मढ्यांना सरणावर ठेवून केवळ सत्ता हेच धोरण असणारी पार्टी केवळ भाजपच असू शकते. ज्याला मरणार्‍याची चिंता नाही, ज्याला पक्षासाठी काबाडकष्ट केलेल्या माणसाच्या मृत्यूवर दु:ख नाही. ज्यांना केवळ सत्ता आणि सत्ताच पाहिजे ते सर्वसामान्य, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांच्या सरणाची कुठली चिंता करणार? हा सवाल आता उपस्थित होतोच. अनेक भक्त आम्ही सवाल विचारला की, आमच्या विचारसरणीवर आळ घेतात. आम्हाला संताप येतो याचा, अरे, कधी तरी चुलीत घाला सत्ता आणि सरणावर जाणार्‍या शेतकर्‍यांसह मुख्यमंत्र्यांच्या पार्थीवदेहाची थांबा अवहेलना, एखाद्या मुख्यमंत्र्याचं सरण रचलं जात असेल, त्याला अग्निडाग दिलं जात असेल, त्याच्या राखेला तरी शांत होऊ द्या, परंतु हे भाजपाकडून त्याठिकाणी झालं नाही आणि पुन्हा एकदा गलिच्छ, गचाळ, सत्ताखोर, सत्तालालसी राजकारणाची अनुभूती गोव्यामध्ये दिसून आले. भाजपाची तिथे मध्यरात्री दोन वाजता सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review