ताज्या बातम्या

अग्रलेख -गणेश सावंत- विजयासाठी युद्धाची गरज ? रक्त अन् अश्रू 

येडियुरप्पा - ‘ पाकिस्तानवरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल, कर्नाटकातील २८ पैकी २२ लोकसभा जागा आम्ही जिंकू ’

 -गणेश सावंत

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या तख्ताला लक्ष्य केलं. हे लक्ष्य गाठण्यासाठी कॉंग्रेसमुक्त भारताची गर्जना दिली. देशात फोफावलेला भ्रष्टाचार, महागाई या दोन प्रमुख गोष्टींना प्रचाराचं केेंद्रबिंदू ठेवलं. अच्छे दिनचे स्वप्न अखंड देशात पेरून मोदींनी एक नव्हे दोन नव्हे शेकड्यावर घोषणा केल्या. आश्‍वासनाचा अक्षरश: पाऊस पाडला. मात्र वर्ष दोन वर्षातच मोदींचे निर्णय हे देशातील सर्वसामान्यांसाठी आत्मघातकी आणि स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपने सारखे उघड होत राहिलं. पक्षाचे अध्यक्ष अमित शहांनी निवडणुकीत मतांसाठी जुमलेबाजी करावी लागते, हे कबुल केलं. तर आपल्या कर्तृत्वाने चर्चेत असलेले केंद्रातले मंत्री नितीन गडकरी यांनीही या जुमलेबाजीवर स्पष्टपणे मोहर लावली. त्यामुळे देशातील जनतेला भाजपाच्या अच्छे दिनची खरी अनुभूती येत राहिली आणि भाजप देशामध्ये बॅकफुटवर जात राहिले. २०१४ च्या निवडणुकीत मिळवलेले घवघवीत यश २०१९ च्या निवडणुकीत मिळेलच हे सांगणे कठीण होऊन बसले आणि ते भाजपाला उमजलेही. सत्तेसाठी कुठलाही निर्णय घेण्यात पटाईत असणारे म्हणण्यापेक्षा हुकुमशहाचे पाईक असणारे भाजपाचे सर्वोच्च मोदींनी २०१९ च्या लोकसभेत आपला विजयी अश्‍व सोडला. हा जो अडवेल त्याच्याशी दोन हात करण्याचा चंगही मोदींच्या आदेशावरून देशभरातील भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनी बांधला. मात्र पदोपदी हा अश्‍व रोखला जाऊ लागला. एवढेच नव्हे तर गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदींचा अश्‍व रोखून त्यांच्यासोबत दोन हात करून कॉंग्रेसने तीन राज्य जिंकून घेतले. हा कॉंग्रेसचा विजय नव्हता, ही जुमलेबाज सरकारची हार होती. त्या त्या राज्यातल्या लोकांचा संताप होता. सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, कामगार, दिनदुबळ्यांचा तळतळाट होता. २०१९ ला तर सामोरे जायचय आणि विषयही महत्त्वाचा हवाय म्हणून 
प्रभू राम 
पुन्हा पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा पुन्हा पुन्हा देण्यात येऊ लागला. मात्र भाजपाचा मतासाठी असलेला राम वनवासाला गेल्यागत तो पुन्हा सत्तेच्या अयोध्येत यायला तयार नाही. हे लोकांच्या मानसिकतेतून दिसून आले. राम मंदिरावरून देशभरात प्रचंड कलह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी संशयकल्लोळ उभा करण्यात आला. २०१४ ला भाजपाने जे आश्‍वासन दिले होते त्या आश्‍वासनामध्ये राम मंदिर हे प्रमुख होते. परंतु भाजप सरकारला राम मंदिराचा प्रश्‍न सोडवता आला नाही. सत्तेत असलेले लोक हुकुमशहा असोत, मन की बात करणारे असोत, या देशात जन की बातला अधिक महत्त्व आहे आणि ते महत्त्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्राप्त करून दिलं आहे. म्हणूनच राम मंदिराचा प्रश्‍न हा न्यायमंदिरात असताना सत्तेच्या मस्तीत असणार्‍यांच्या आश्‍वासनाला इथं अधिक महत्त्व नसणार हे पुन्हा एकदा देशाला पटलं. भाजप केवळ सत्तेसाठी आश्‍वासनाचे फवारे उडवतं, देशातील जनतेच्या रिकाम्या पोटाचं, शेतकर्‍यांच्या जिवनाचं, कष्टकर्‍यांच्या हाताचं, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं, लोकांच्या आरोग्याचं, रयतेच्या दैनंदिन जिवनाचं, सत्ताधार्‍यांना काहीच देणंघेणं नाही किंवा या सर्व गोष्टीतल्या रामाचं भाजपाला कोडकौतुक नाही हे जेंव्हा सिद्ध झालं आणि उभा देश महागाईवर बोलू लागला, नोटबंदीच्या निर्णयावर सवाल विचारू लागला, जीएसटीचे मानगुटीवर बसलेले भूत व्यापार्‍यांना लक्षात येऊ लागलं, काळं धन देशात आलं नाही हे उघड सत्य जेव्हा समोर आले अंबानींपासून मोठमोठ्या पैशावाल्यांना अरबोखरबोमध्ये कर्जमाफी झाल्याचे आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष झाल्याचे जेंव्हा लोकांच्या समोर आलं तेव्हा हे सरकार सर्वसामान्य, कष्टकर्‍यांचं नाही, पैशावाल्यांचं आहे ही वस्तूस्थिती जेंव्हा गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात लोकांनी याची देही याची डोळा अनुभवली तेव्हा 
विजयासाठी 
युद्धाची गरज आहे
का ? हा सवाल आम्हाला जसा पडला तसा उभ्या देशाला गेल्या काही दिवसांपासून पडला आहे. पुलवामात अतिरेक्यांनी आमच्या जवानांवर हल्ला केला, ४२ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, या रक्तपाताने अखंड देशवासियांच्या डोळ्यात रक्त उतरले. अतिरेक्यांचा खातमा झालाच पाहिजे ही प्रत्येक देशवासियांची भावना राहिली. या पाच वर्षातला हा पहिला हल्ला नव्हता. यापूर्वीही उरीमध्ये झालं होतं. काश्मिरच्या अनंतनागसह अन्य भागात रोज चकमक होते, दहशतवाद जो गेल्या ७० वर्षांपासून सुरू आहे, त्याच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्या नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही सुरू राहिल्या आहेत. परंतु पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने ज्या तत्परतेने ताठर भूमिका घेतली आणि पाकिस्तानच्या सिमेमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली ही अभिनंदनीय बाब आहे. या ठिकाणी सैनिकांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले पंतप्रधान यांचंही नक्कीच अभिनंदन आहे. परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने युद्धज्वर पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दाखवला आणि त्या युद्धाचा आणि हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या रक्ताचा निवडणुकीसाठी शाई म्हणून जो वापर करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांसह भाजपाकडून झाला तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक म्हणावाच लागेल. देशाच्या सीमा बलशाली बनवणं हे दिल्लीचं तख्त संभाळणार्‍याचं धोरण असावंं परंतु त्याच दिल्लीतख्तेश्‍वराच्या संरक्षण मंत्रालयातून जेव्हा राफेलचे कागदपत्र चोरीला जातात तेव्हा मात्र दिल्ली तख्तेश्वराच्या प्रत्येक गोष्टीवर संशय आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच 
निवडणूक आयोगाचा निर्णय 
सूचक ठरत आहे. निवडणूक आयोगाने युद्ध आणि सैनिकांचा प्रचारासाठी वापर करू नका, असे स्पष्टपणे सांगितले आहे. सत्तेसाठी सैनिकांच्या रक्ताची शाई वापरण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर त्या विरुद्ध देशातला किसान आणि सर्वसामान्य आवाज उठवेलच. कर्नाटक भाजपचे येडियुरप्पा सैनिकांनी कारवाई केल्यानंतर म्हणाले होते, ‘पाकिस्तानवरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल, कर्नाटकातील २८ पैकी २२ लोकसभा जागा आम्ही जिंकू’, येडियुरप्पांनी जसे हे वक्तव्य केले तसे भाजपाच्या अनेक नेत्यांनीही बोलून दाखवलं. भाजपाची ही भूमिका खरच निंदनीय आहे. सत्तेसाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी युद्धाची गरज भाजपाला का पडतेय?
रक्त आणि अश्रू 
संंयमी भारतीयांचे कधी शस्त्र असतील तर कधी मित्र असतील परंतु त्याच रक्ताचं आणि अश्रूंची विक्री होत असेल तर देशवासियांच्या धमण्यात सळसळणार्‍या या रक्ताचा लाव्हा रस केंव्हा होईल आणि या लाव्ह्यात रक्त आणि अश्रूंची विक्री करणार्‍यांची होरपळ कधी होईल हे सांगणे कठीण आहे. आज देशाला जशी जमिनीची गरज आहे त्यापेक्षा अधिक या देशातील जनतेची तेवढीच गरज आहे आणि त्याच जनतेकडे, त्याच सर्वसामान्य माणसाकडे दुर्लक्षित करण्याचं काम सरारकडून होताना दिसतय. देशातल्या भाजपाला लोकसभा विजयासाठी युद्धाची गरज आहे तर बीड जिल्ह्यात भाजपाला विजयासाठी अश्रूंची गरज आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये स्व. मुंडेंचा विजय झाला. अकाली अपघाती निधनानंतर डॉ. प्रीतम मुंडे यांना अनेक पक्षांनी विरोध न करता लोकसभेत पाठवले आणि तेथून पुढे पालकमंत्री पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व करताना अनेक वेळा अश्रू डहाळले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी तर काल ‘माझे बाबा’ किंवा अश्रूंवर आता मते मिळणार नाहीत हे सांगून टाकले आहे. त्यामुळे युद्धज्वरावर आणि अश्रूंवर आधारलेल्यांनी विजयासाठी विकासाची पेरणी करावी.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review