घराणेशाहीचा काँग्रेसला संपवेल !

 

कॉंग्रेसने घराणेशाहीला पोसलेच नव्हे तर मोठे आणि बळकट केले. बाप झाला की, पोरगा चर्चेत येतो. दुसर्‍यांना संधीच दिली जात नाही. त्यामुळे वंचीत समाज घटक फक्त मतदानापुरताच उरला आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यात कुठल्या ना कुठल्या मतदार संघात घराणेशाहीची एक पिढी आमदार, खासदारांच्या रुपाने पुढे येते. नगर येथील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने बंड केले. पिता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असतांना मुलाने भाजपात प्रवेश केला. काय तर लोकसभेसाठी नगरची जागा कॉंग्रेसला का सोडली नाही? विखे यांच्या सारखी घराणेशाही राबवणारी मंडळी प्रत्येक जिल्हयात आहे. सामान्य माणूस कॉंग्रेस पासून दुर जातो याचं हेच एकमेव कारण आहे. कॉंग्रेसने राजकारणाची कुस बदलली नाही तर कॉंग्रेसला घराणेशाहीतील नेते मंडळीच संपवतील त्याला इतर पक्षांनी संपवण्याची गरज पडणार नाही. मग विखे काय किंवा अशोक चव्हाण काय किंवा सुशीलकुमार शिंदे काय ही मंडळी राजकारणात मोठ-मोठी पदे भोगून बसली असली तरी त्यांनी आपल्या घरातील सदस्यांना राजकारणात सक्रीय करुन ठेवले आहे. घरातून इतराकडे पद जाता कामा नये अशी दक्षता राजकारणातील प्रस्तापीत मंडळी घेत असतात. या घराणेशाहीमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त घोषणा देण्यापुरता उरत आहे.
राजकारण हे अफुच्या गोळी सारखं आहे, मग राजकारण ग्रामपंचायतीचं असेल किंवा विधानसभा, लोकसभेचं असेल. राजकारणात आपलाच विजय व्हावा अशी अपेक्षा बाळगळी जाते. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी पुढार्‍यांची असते. कॉंग्रेस पक्ष जुना असला तरी या पक्षाने घराणेशाहीचा कित्ता गिरवला. कार्यकर्त्यांना फक्त झुलवत ठेवणं आणि आमिष दाखवणं याच्या पलीकडे या पक्षाने काही केलं नाही. आपलीच पिढी पुढे आमदार, खासदार असली पाहिजे अशी व्यवस्था घराणेशाही राबवणारी राजकीय मंडळी करत असते. इतरांनी राजकारणात नाक खुपसू नये अशी सोय प्रस्थापीत मंडळी करुन ठेवतात. मग त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात ही जाणं पसंद केलं जातं. ७० वर्षाचा इतिहास बघितला तर असं लक्षात येतं की, राज्यात फक्त काही बोटावर मोजण्या इतक्याच कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनी सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आणि पुढेही आपल्याच वारसाचा झेंडा रोवला जावू लागला. नगरचे राधाकृष्ण विखे हे विधासभेचे विरेाधीपक्ष नेते आहेत. त्यांचा मुलगा सुजय हा लोकसभेसाठी हट्ट धरुन बसला. आघाडी झाल्याने दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यात अनेक मतदार संघात अडचणी निर्माण झाल्या. नगरची जागा कॉंग्रेसला सोडण्याचा हट्ट सुजय विखे यांनी धरला. ही जागा कॉंग्रेसला सुटत नसल्याचे पाहून त्यांनी भाजपात प्रवेश केला. पिता कॉंग्रेसचा विरोधी पक्ष नेता आणि मुलगा भाजपाचा कार्यकर्ता झाला. पदासाठी राजकारण किती वेगळं वळण घेतं हे सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशावरुन दिसून आलं. पाच वर्ष राधाकृष्ण विखे कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते राहिले ऐन निवडणुकीत मुलानेच कॉंग्रेसच्या विरोधात बंड पुकारले ही लाजीरवाणी गोष्ट नाही का? घराणेशाहीमुळे राधाकृष्ण विखे यांना विरोधीपक्ष नेते पद देण्यात आले. इतर सर्वसामान्य आमदाराला हे पद का मिळाले नाही? इतर आमदारात पद सांभाण्याची कुवत नव्हती का? घराणेशाही पोसण्याचं आणि बळकट करण्याचं काम कॉंग्रेस पुर्वीपासून करत आली. राधाकृष्ण विखे काय किंवा नांदेडचे अशोक चव्हाण, सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे या मंडळीने मोठ-मोठी पदे भोगली तरी ही मंडळी राजकारणाला चिटकून बसलेली आहे. अशोक चव्हाण प्रदेश अध्यक्ष आहेत, ते खासदार ही आहेत. त्यांच्या पत्नी आमदार आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासह अन्य महत्वाची पदे भुषविले तरी त्यांना अद्याप राजकारणाचा मोह सोडला आला नाही. त्यांची मुलगी आमदार आहे. या प्रस्थापीत मंडळीसारखी अनेक मंडळी जिल्हा पातळीवर राजकारणाला घट्ट पकडून आहेत. राजकारणातील शिडी संपवण्याचं नाव प्रस्थापीत मंडळी घेत नसल्याने वंचीत लोकांना राजकारणात भाव आणि वाव मिळत नाही. लोकांची इच्छा आहे म्हणुन आमूक -आमुक साहेब लोकसभा, विधानसभा निवडणुक लढवत आहे अशा बाष्कळ बाता प्रस्थापीत मंडळी मारण्याचं काम करत आहे. जनतेवर घराणेशाही जाणीवपुर्वक लादली जाते. घराणेशाहीचा फटका कॉंग्रेसला बसत आहे. पक्षाला जी घरघर लागली ती केवळ घराणेशाहीमुळे, कॉंग्रसने घराणेशाहीची कुस बदलली नाही तर जी काही कॉंग्रेस उरली आहे ती संपवायला इतर पक्षाची गरज भासणार नाही.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review