संपादकांचा चष्मा- गणेश सावंत -२०१९ च्या निवडणुकीसाठी काय म्हणतो मराठवाडा

 गणेश सावंत -
पंधरा वर्ष सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महाराष्ट्रातून उलथून कसे फेकायचे हे शिवसेना भाजपाला उमजत नसतांनाच २०१४ साली गुजरात विकासाचं मॉडेल समोर करत भाजपाने चहावाला पंतप्रधानपदाचा चेहरा समोर आणला आणि अवघ्या देशात अच्छे दिनचे स्वप्न पाहणार्‍या सर्वसामान्यांनी या चेहर्‍याला आपलंसं करत २०१४ मध्ये भाजपाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं. आता या मोदींचा विजयी अश्‍व गेल्या सहा महिन्यापूर्वी देशात झालेल्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीत ३ राज्यातील मतदारांनी रोखला. तसं देशातील विरोधी बाकावर असणार्‍या कॉंग्रेससह प्रादेशिक पक्षांना बळ मिळालं. त्यात काल २०१९ च्या लोकसभा निवडणूकीची घोषणा झाली. मराठवाड्यातल्या ८ लोकसभा मतदार संघापैकी ६ मतदार संघाची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात तर दोन मतदार संघाची निवडणूक तिसर्‍या टप्प्यात घेण्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयूक्त सुनिल अरोरा यांनी केल्यानंतर मराठवाड्यातल्या आठही मतदार संघाचा आजचा आढावा काय म्हणतो? हे निवडणूक घोषीत झाल्यानंतर अवघ्या २४ तासात सांगताना सद्य स्थिती जी आहे ती पाहू!
सातत्याने मागास म्हणून ओळखला जाणारा, सिंचनाचा अभाव असणारा कष्टकरी, कामगार, ऊसतोड कामगारांचा भाग म्हणून ओळखला जाणारा, दुष्काळवाडा म्हणून चर्चेत राहणार्‍या मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या लोकसभा मतदार संघात दुसर्‍या टप्प्यात निवडणूका होत असून १८ एप्रिलला मतदान होणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद व जालना मतदार संघात २३ एप्रिलला मतदान होणार आहे. या अनुषंगाने सर्वच पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी आणि नेतृत्व कामाला लागले आहे. परंतू निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्या त्या मतदार संघाचा आढावा रिपोर्टरच्या चष्म्यातून कसा दिसतो हे पहावं लागेल!
औरंगाबाद
मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबादकडे पाहितलं जातं. विचारशील आणि तितकेच संवेदनशिल या मतदार संघातले लोक आहेत. या ठिकाणी आजपर्यंत शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. या वर्षी औरंगाबाद लोकसभा मतदार संघ कोण जिंकणार? याकडे अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचा पारंपारीक गढ म्हणून मानल्या जाणार्‍या या मतदार संघात खर्‍या अर्थाने पुर्वीच्या काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असायचा! तसा मराठवाडाच कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता परंतू त्यांना शह देण्यासाठी कम्यूनिस्टही तेवढेच ताकतीने उभे राहायचे परंतू ती ताकद कम्यूनिस्टांची औरंगाबादमध्ये तेव्हाही पहायला मिळालेली नव्हती. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणामुळे कॉंग्रेसकडून हा मतदार संघ शिवसेनेला काबीज करता आला. गेल्या निवडणूकीत विद्यमान खा.चंद्रकांत खैरे यांच्याविषयी नाराजी असतांना मोदी लाटेत ते तरले गेले असे उघडपणे विरोधक म्हणतात. त्यात तथ्यही असू शकते. प्रत्यक्षात खैरेंच्या विरोधात खर्‍या अर्थाने कॉंग्रेसला त्या ठिकाणी तुल्यबळ असा उमेदवार देता आला नाही ही वस्तूस्थिती नाकारता येणारी नाही. आताच्या निवडणूकीतही प्रचार यंत्रणा राबवण्यापासून ते पक्षांतर्गत गटबाजीचा विचार केल्यास खैरेच्या किंबहूना शिवसेनेविरूद्ध लढणार्‍या उमेदवाराला बारकाईने विचार करावा लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस  यांच्यामध्ये या ठिकाणी कोण लढावं? या चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेले असले तरी बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी दावा करत असल्याने पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मताची या ठिकाणी विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. 
लातूर
मराठवाड्याला मुख्यमंत्री पदाचा बहूमान मिळवून देणार्‍या स्व.विलासराव देशमुखांच्या लातूरमध्ये. या वर्षी लातूरकर कोणाला साथ देतात? हे पहाणे उत्सूकतेचं ठरेल. २०१४ च्या पूर्वी कॉंग्रेसचे मातब्बल नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव भाजपाच्या रुपाताई निलंगेकर यांनी केला. तेव्हाच लातूरची लोकसभा भाजपकडे जाताना दिसून आली परंतू ती लढत अतीतटीची असल्यामुळे पुन्हा कॉंग्रेस या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करेल. २०१४ च्या निवडणूकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करणं ही चेष्टेची बाब नव्हती त्यात हा मतदार संघ राखीव सूटला होता. अशा स्थितीत भाजपाच्या सुनिल गायकवाडांनी कुठलीही कर्तबगारी नसतांना विजयाचा झेंडा फडकवला आणि थेट दिल्ली गाठली होती त्यामुळे आता या मतदार संघात जेवढं महत्त्वं देशमुख घराण्याला आहे तेवढंच महत्त्व भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर यांनाही प्राप्त होताना दिसून येतं. येणार्‍या आठवडाभरातच निवडणूक रंग भरेल आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसायला सुरूवात होईल. 
उस्मानाबाद
जिल्हा म्हणून उस्मानाबाद नकाशावर असला तरी मराठवाड्यातल्या इतर मागास जिल्ह्यापेक्षाही मागास म्हणून उस्मानाबादकडे पाहितलं जातं. परंतू या जिल्ह्याचं राजकारण तेवढं मागास नाही. महाग मात्र नक्कीच आहे. या ठिकाणचं राजकारण अडवाअडवीपासून जिरवाजिरवीपर्यंत आरपारचं असल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहितलेलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या दोघातली या ठिकाणची पारंपारीक लढाई जशी कुरूक्षेत्रावरली लढाई समजली जाते. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर तुळजापूर मतदार संघ सोडला तर कॉंग्रेसची इतर तालुक्यात फारशी ताकद पहायला मिळत नाही. आताची निवडणूक कोणत्याच लाटेवर नसल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना ही लढत अत्यंत कडवी होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत या ठिकाणी शिवसेनेचे डॉ.रवींद्र गायकवाड हे विजयी झाले होते. या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकतीनिशी उभा राहू पाहत असली तरी शिवसेना आपली मांड सोडायला तयार नसेल हेही तेवढेच खरे. त्यात या ठिकाणी बहूजन वंचित आघाडीचा उमेदवार आला तर तो आघाडीच्या उमेदवाराला डोकेदुखी ठरेल. 
बीड 
राज्याच्या राजकारणामध्ये स्थिरता आणि अस्थिरता निर्माण करण्याची खुमखूमी असणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहितले जाते. सध्या मुंडे घराभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरत आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजप सरकारच्या कॅबिनेटमध्ये  तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे असल्याने बीड जिल्ह्यात मुंडे-भाऊ-बहिणीची लढाई अत्यंत कडवी पहायला मिळेल. २०१४ च्या निवडणूकीत स्व.गोपीनाथराव मुंडे विरूद्ध सर्व नेते अशी स्थिती असतांना गोपीनाथराव मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झाले होते तेव्हा राष्ट्रवादीत असलेले आणि आज भाजपाच्या काफील्यात स्थिरावलेले सुरेश धस यांचा पराभव केला होता मात्र दुर्दैवाने गोपीनाथरावांचे अकाली अपघाती निधन झाले. पोट निवडणूकीत त्यांच्या दुसर्‍या कन्या डॉ.प्रितम मुंडे या निवडणूकीला सामोर्‍या गेल्या. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला नाही तर कॉंग्रेसचे अशोक पाटील निवडणूक रिंगणात उतरले. मोदी लाट आणि गोपीनाथरावांच्या निधनाने शोकाकूल झालेल्या बीड जिल्ह्याने प्रितम मुंडे यांना लाखाच्या घरात मते देत निवडून आणले. त्यानंतर गेल्या ४ ते ५ वर्षांच्या कालखंडात जिल्ह्यात अनेक राजकीय स्थित्यांतरे घडली आहेत. राष्ट्रवादीच्या ताब्यात येणारी जिल्हा परिषद धस क्षीरसागरांमुळे भाजपाच्या ताब्यात गेली अन् राष्ट्रवादीची अंतर्गत बंडाळी अवघ्या पाच वर्षात पदोपदी पहायला मिळाली. आणि आजही ती दिसून येत आहे. तसं पाहिलं तर प्रितम मुंडे यांची खासदार म्हणून ठोस अशी कामगिरी दिसून येत नसली तरी त्यांच्या बहिण पंकजा या त्यांना कव्हर करायला असल्याने त्या स्थिरावलेल्या आहेत. भाजपाकडून प्रितम मुंडे यांचं नाव समोर आहे मात्र राष्ट्रवादीने अद्याप आपला उमेदवार दिलेला नाही. या स्थितीत बीडमध्ये मुंडे भाऊ बहिणीची लढाई ही महाराष्ट्रासाठी लक्षभेदक ठरणार आहे. हेही तेवढंच खरं. गेल्या निवडणूकीत लाखाच्या फरकाने प्रितम मुंडे आल्या खर्‍या परंतू या निवडणूकीत लाखाचा फरक हजारावर आला तरी तो त्यांच्यासाठी मोठा विजय ठरणार आहे. राष्ट्रवादीला इथे आव्हान स्विकारवं लागणारं आहे परंतू अशोक पाटलांना २०१४ च्या निवडणूकीत पडलेले पाऊणेदोन लाख मतदान भाजपाने विसरून चालणार नाही आणि त्यात दलित, ओबीसी, धनगर, मराठा, मुस्लिम मतदारांची मानसिकताही भाजपाला धोकादायक आणि राष्ट्रवादीला तारणारी ठरली तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आज जरी उमेदवार घोषीत नसला तरी विधान परिषदेचे माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या नावावर राष्ट्रवादी शिक्कामोर्तब करेल.या मतदार संघात वाढलेल्या दोन लाख नवा मतदारांचा कलही महत्वाचा राहील.
परभणी
लोकसभा मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष शक्य तो समतोल असल्याचे चित्र आतापर्यंत दिसून आलेलं आहे. शिवसेनेलाही मानणारा वर्ग आणि राष्ट्रवादीलाही मानणारा वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असल्याने या मतदार संघात विद्यमान खासदार संजय जाधव हे सातत्याने चर्चेत राहतात. मतदार संघातही  असतात  त्यामुळे राष्ट्रवादीकडून आव्हानात्मक उमेदवार कोण? एवढ्या चर्चेशिवाय या ठिकाणी आणखी दुसरी चर्चा सध्यातरी होताना दिसून येत नाही परंतू शिवसेनेसाठीही गेल्या निवडणूकीत मोदी लाटेची गरज भासली होती ती लाट आता ओसरलेली आहे. याची जाणीव शिवसेना उमेदवाराला असेलच, त्यापेक्षा राष्ट्रवादी येथे निवडणूकीला कशी सामोरी जाते हे येणार्‍या आठवड्यात कळणारच आहे. 
हिंगोली
२०१४ च्या निवडणूकीमध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघात मोदी लाटेचा मोठा प्रभाव नसल्याचे सांगण्यात येते. येथे स्थानिक विकासाच्या मुद्यांना अधिक महत्त्व प्राप्त असतं. त्याचबरोबर या मतदार संघातले मतदार एकदा निवडून दिलेल्या खासदाराला पुन्हा निवडून देत नाहीत असा इतिहास आहे. एखादा अपवाद वगळला तर हा इतिहास तंतोतंत लागू आहे. त्यामुळे सध्या या मतदार संघावर कॉंग्रेसचे राजीव सातव हे खासदार म्हणून आहेत त्यांनी शिवसेनेचे वानखेडे यांचा पराभव केलेला होता. राजीव सातव हे तरणे ताठे आणि थेट राहूल गांधी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे युवा नेतृत्व आहे त्यामुळे इथे शिवसेनेला सातवांचं आव्हान राहिलच आणि अपवादाचं उत्तर येणार्‍या काळात मिळेलच. 
नांदेड
मराठवाड्यातला मराठवाड्यातच नव्हे तर देशामध्ये चर्चेत आणणारे आणि मुख्यमंत्री पदही मराठवाड्याकडे घेवून मराठवाड्याची मान उंचावणारे स्व.शंकरराव चव्हाणांचे नांदेड म्हणून सर्व परिचित आहेत. आता नांदेड लोकसभा मतदार संघावर केवळ शंकरराव चव्हाणांची पुण्याई आणि कतृत्वामुळेच हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला हे उघड सत्य नाकारता येणारं नाही. जनता दलासारख्या पक्षाने या ठिकाणी आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही यश आलं नाही. शिवसेना, भाजपा या दोघांनाही नांदेडात केवळ धर्मनिर्रपेक्ष विचारधारेचे लोक राहतात म्हणून आपले पाय रोवता आले नाही. या स्थितीत एमआयएमसारखा आक्रमक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेत घुसखोरी करू पाहत राहिला परंतू एकवेळेस घुसखोरी केलेल्या या पक्षाला दुसर्‍यांदा नाकारण्यात आले. हे सर्व स्व.शंकरराव चव्हाण यांचे पूत्र तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीत या घडामोडी घडत राहिल्या. अशा स्थितीत अशोक चव्हाणांनी आपला बालेकिल्ला साबूत ठेवला. २०१४ च्या मोदी लाटेत स्वत: निवडून येवून आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या मतदार संघात धमनिर्रपेक्षतेला अधिक महत्त्व आहे आणि येथे बहूजन वंचित आघाडीने आपला उमेदवार टाकला तर तो अशोक चव्हाणांसाठी डोकेदूखी ठरेल हे जरी खरे असले तरी मताच्या विभागणीत आपला विजय हे जर शिवसेनेचे गणीत असेल तर ते तेवढे सोपे राहणारे नाही. 
जालना
जालना लोकसभा मतदार संघ गेल्या २० वर्षांपासून भाजपाच्या नेतृत्वात आहे. रावसाहेब दानवे हे १९९९ पासून या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. या ठिकाणी कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीला घुसखोरी करता आलेली नाही. इथे शिवसेना आणि भाजप यांच्यातच अंदरुनि टक्कर पहायला मिळते. २०१४ साली दानवे पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतले मात्र त्या ठिकाणी ते जास्त काळ टिकले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्या पदरी देवून त्यांची रवानगी पुन्हा महाराष्ट्रात करण्यात आली. गेल्या चार ते पाच वर्षांच्या कालखंडात दानवे हे बाष्कळ व वायफळ बडबडीने चर्चेत आहेत. कधी शेतकर्‍यांना रडतेत साले! तर कधी आणखी कुठलं वक्तव्य करून दानवेंनी सर्व सामान्य कष्टकरी वर्ग आपल्या अंगावर घेतलेला आहे. आता राजकीयदृष्ट्या दानवेंना आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्टा करावी लागणार आहे. ते भाजपाचे दावेदार उमेदवार म्हणून नक्कीच आहेत परंतू युतीमुळे या ठिकाणी शिवसेनेचे नेते अर्जून खोतकरही हाबूक ठोकून आहेत त्यामुळे उमेदवारीसाठी अगोदर दानवे-खोतकरांमध्ये संघर्ष होईल. येथे कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून खोतकरांना अदरूनी मदत मिळाली तर ते नवल नसणार नाही परंतू अशा स्थितीतही कॉंग्रेस राष्ट्रवादी आपला प्रबळ उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याने आणि थेट मुख्यमंत्र्यांचीच भुमिका या मतदार संघात संशयास्पद असल्याने उद्याच्या आठवड्यात इथलं चित्र काही औरच राहिलं तर ते नवल नसेल!

अधिक माहिती: beed

Best Reader's Review