सुरेश धसांची घेतली आ. जयदत्त क्षीरसागरांची भेट; एक तासाच्या गुफ्तगूनंतर जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना वेग


बीड (रिपोर्टर):- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे पाच सदस्य भाजपाच्या काफिल्यात पाठविल्याच्या कारणावरून माजी मंत्री सुरेश धसांचे राष्ट्रवादीतून निलंबन झाले. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथही झाल्या असतानाच काल माजी मंत्री तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आष्टी येथे सुरेश धसांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांनी बंद दाराआड गुफ्तगूही केली. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल नेटवर्किंग मीडियावर व्हायरल होत असून या भेटीत दोघांनी काय चर्चा केली याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. 
सुरेश धसांचे राष्ट्रवादीतून निलंबन झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आष्टीमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का देत बाळासाहेब आजबेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला. या प्रवेशासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची उपस्थिती होती. प्रवेशा दरम्यानच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादी नेत्यांनी सुरेश धसांवर प्रचंड आरोप केले. त्यांना गद्दार म्हणून संबोधले. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस धसांना अडचणीत आणू पहात असतानाच सुरेश धसांचा भाजप प्रवेशही रखडत चालला आहे. धसांना भाजपही ताटकळत ठेवत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत बीड विधानसभा मतदारसंघात पुतण्याने कोंडीत पकडलेले जयदत्त क्षीरसागरांनी काल थेट धसांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा ते एक तास चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी चर्चा काय झाली हे समजू शकले नसले तरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात या दोघांच्या भेटीवर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. दोघांच्या भेटीची जोरदार चर्चा सध्या जिल्हाभरात रंगली आहे. एकीकडे संदीप क्षीरसागरांना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने दिलेला आधार आणि तिकडे आष्टीमध्ये सुरेश धस झालेले निराधार यातूनच या दोघांची ही झालेली भेट पाहता धस-क्षीरसागर भेटीला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. जयदत्त क्षीरसागर हे बीड जिल्ह्याचे मुरब्बी नेतृत्व असून गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना  गैरहजर दिसून आलेले आहेत. त्यातच सुरेश धसांच्या भेटीने अनेक चर्चांना उधान आले आहे. या चर्चे दरम्यान केवळ सुरेश धसांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदत्त धस हे रूममध्ये असल्याचे दिसून येते. 
 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review