ताज्या बातम्या

पवारांच्या विचाराशी परतारणा  करणार नाही-संदीप क्षीरसागर

माझ्याकडे फक्त काकू-नानांचे आशिर्वाद,क्षीरसागर नाव उरलं
पवारांच्या विचाराशी परतारणा 
करणार नाही-संदीप क्षीरसागर
विद्यमान आमदारांनी मतदार संघाचं वाटोळं करून टाकलय. बीड शहरात रस्ते नाहीत, नाल्या नाहीत, स्वच्छ पाणी नाही, स्वच्छता नाही, विकास पुरूष बिरूदावली मिरवल्याने विकास होत नसतो. त्यांना पुरोगामी विचाराचं देणंघेणं नाही. फक्त सत्तेचं देणं-घेणं आहे. सत्ता नव्हती म्हणून ते तडफडत होते. विचाराला आणि आचारणाला फरक असतो. सत्ता नसतांना उन्हाचे चटके बसू लागले की ते लागलीच सत्तेत गेले. मात्र मी पंचायत समितीची सत्ता गेली तरी विचाराशी एकनिष्ठ राहिलो. दोन क्षीरसागरातला हा फरक आहे. माझ्याकडे फक्त क्षीरसागर नाव उरलयं, काकू-नानांचे  आशिर्वाद आणि लोकांचे प्रेम माझ्यासोबत आहेत. लोकाहो मला संधी द्या असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते तथा राष्ट्रवादीच कॉंग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागरांनी रिपोर्टरच्या थेट सवालांना उत्तरे दिली. सायं.दै.बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती पाहता,राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून बीडमध्ये तुम्हाला निवडणूक सोपी जाईल का?
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही नेते पक्षाबाहेर गेले हे खरे आहे. परंतू महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा असो अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा कार्यक्रम असो तेथे सर्व सामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिनदुबळा, पिचलेला, रंजलेला प्रत्येक माणूस उपस्थित राहत आहे, मोदी गर्दी करत आहे. सरकार विरोधात घोषणा देत आहे, सर्वसाामन्य माणसाकडून पक्षाला जो प्रतिसाद मिळत आहे तोच प्रतिसाद मला बीड शहरासह मतदार संघात मिळत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मी शहरातल्या घराघरात जात आहे. भेटी गाठी घेत आहे. सुख:-दु:खाचं बोलत आहे आणि आज निवडणूका लागल्या म्हणून मी फिरत नाही. जेंव्हा राजकारणात मी अधिक सक्रीय झालो तेंव्हापासून फिरत आहे. रात्रन् दिवस माणसांमध्ये राहत आहे आणि जो माणूस लोकांमध्ये राहतो त्याला निवडणूकीची भितीच वाटत नाही. 
उद्याच्या निवडणूका कुठल्या 
मुद्यावर लढवणार आहात?
माझे मुद्दे अत्यंत छोटे-छोटे आहेत. पण ते लोकांच्या हिताचे आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मुलभूत गरजांचे आहेत. आत्तापर्यंत अनेक निवडणूका झाल्या,निवडणूका दरम्यान विद्यमान आमदारांनी आपल्या वचननाम्यातून लोकांना अनेक आश्‍वासने दिली. २०१४ विधानसभा निवडणूक वचननाम्यात बीडचे आमदार यांनी जे-जे आश्‍वासने दिले होते. त्यापैकी किती आश्‍वासनांची पुर्तता झाली. बीड विमानतळ बांधणार म्हणणार नाही, मी वातानुकूलीत औद्योगिक वसाहत उभारणार म्हणणार नाही. अशा भक्पेबाजीला आणि थोतांडांना लोक आता कंटाळले आहेत. मी फिरतोय ना तर मला लोक ठिकठिकाणी उघड बोलत आहेत. ते म्हणतात काही नेते निवडणूका आल्या की येतात, निवडूण गेले की साध वळूनही पाहत नाहीत. आमचं ऐकायला सुद्धा येत नाहीत. मोठ-मोठ्या गोष्टी करायच्या, हजारो कोटी आणल्याच्या बढाया वर्तमानपत्रातून मारायच्या, यापेक्षा साधे छोटे-छोटे कामे तरी यांनी केलेत का? मग यामध्ये रस्ते असतील,नाल्या असतील अहो यांनी पिण्या योग्य पाणी तरी दिलय का? स्वच्छ सुंदर बीडचा नुसता नारा आहे. सुभाष रोड आणि सरकारी दवाखान्याचा मागचा भाग सोडला तर मला सांगा शहरातल्या रस्त्याची अवस्था काय आहे? एकही रस्ता चांगला नाही. या निवडणूकीत रस्ते, नाली, स्वच्छ पाणी, शहर स्वच्छ या मुद्यावर आपण उतरणार आहोत. सरकार कुठलही असो योजना एकच असतात. पण त्या काळजीपूर्वक राबवाव्या लागतात. आम्ही न.प.मध्ये विरोधी बाकावर असतांना २०१२ ची कामे २०१७ मध्ये करून घेतलीच ना, ते का झालं तर आम्ही शहरवासियांच्या वतीने नगर पालिकेत राखनदार आहोत. यामुळे लोकांचे आशिर्वाद नक्कीच मला मिळणार आहेत आणि त्या आशिर्वादाच्या जोरावर मी इमाने इतबारे सर्व कामे प्राधान्याने सोडविणार आहे. 
गेल्या तीन महिन्यापासून आपण शहरातल्या प्रत्येक घरात गेलात याचा फायदा या निवडणूकीत होईल का?
मी राजकारण फायद्या तोट्यासाठी करत नाही. माझ्यावर काकू-नानांचे संस्कार आहेत. राजकारण करतांना समाजकारण करायला हवं, ही मला शिकवण आहे. नगर पालिकेच्या निवडणूकीत मतांच्या विभागणीमुळे आमचा काहीसा पराभव झाला. पण शहरातली जनता आमच्या पाठिशी आहे हे तेंव्हाच सिद्ध झालं. आता जे घराघरामध्ये जात आहे ते लोकांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून. आज प्रत्येक जण मला म्हणतोय, ज्यांनी मतांची विभागणी केली ते गेल्या दोन अडीच वर्षात आले नाहीत. जे निवडूण सत्तेत आले तेही फिरकले नाहीत. परंतू भैय्या तुम्ही तरी आम्हाला विचारायला आलात. हे सांगतांना लोकांनी अनेक व्यथा सांगितल्या तेंव्हा बरं वाटलं. लोक आपल्याला आपलं म्हणत आहेत. घरातला माणूस म्हणून आपल्याला अडीअडचणी सांगत आहे. आपल्यावर विश्‍वास ठेवत आहे. यामुळे या निवडणूकीत याचा फायदा नक्कीच होईल हे लपवूनही चालणार नाही. 
या भेटीगाठी दरम्यान एखादी अविस्मरणीय सांगायसारखी आठवण?
प्रत्येक घरातली प्रत्येक चांगली, वाईट प्रतिक्रिया, त्यांचे गर्‍हाणे, त्यांच्या माफक परंतू हक्काच्या मागण्या या आठवणीत राहण्यासारख्या आहेत. त्यापेक्षाही मी जेंव्हा स्वराज्य नगरमध्ये गेलो होतो तेंव्हा एक लहानसा मुलगा पळत-पळत माझ्या दिशेने आला. माझ्या शर्टला धरत त्याने ओढले आणि तो म्हणाला, भैय्या आमचा रस्ता करा ना, आम्हाला शाळेत जाता येत नाही. मी काय बोलणार त्याला, त्याला कसं सांगणार, आमच्या काकांनी शहराचं वाटोळं केलयं. आता तुम्हीच बघा इतक्या लहानशा पोराला समज आहे ही काय मनघडण कहाणी नाही. याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. 
आ.मेटे तुमच्या घराला नाटक म्हणतात, क्षीरसागर ही नाटक कंपनी आहे असं ही म्हणतात?
गेल्या दोन अडीच वर्षात आम्ही जेंव्हा नगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूकीत पॅनल टाकले तेंव्हापासून लोकांत हा संभ्रम आहे. परंतू बीड मतदार संघातील प्रत्येक माणसांनी हे प्रकरण किती टोकाला गेलं हे उघड्या डोळ्याने बघितलं आहे. माझ्या आई, वडिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमची लाईट तोडण्यापर्यंत प्रकार झाला. वडिलांचं नाव संस्थांमधून काढून टाकण्यात आलं हे सर्व खोटं आहे का? 
बीडमध्ये तुमची लढत कोणाशी असेल?
माझी लढत कोणाशीच नाही. पण निवडणूक लढवतांना लोकांच्या प्रश्‍नाशी नक्कीच लढा द्यायचा आहे. त्यांना त्यांचे मुलभूत अधिकार द्यायचे आहेत. यातही मी चुकलो तर लोक कान पिळतीलच ना? 
गेली काही वर्षे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था संभाळत आला आहात, जि.प. पं.स.च्या माध्यमातून तालुक्यासाठी काय कामे केली?
पंचायत समिती माझ्याकडे असतांना सुमारे साडेतीन हजार विहिरी आपण पूर्ण केल्या आहेत. दुष्काळामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी विहिरी घेतल्या, गोरगरीबांचे घरकूल असो, शेतकर्‍यांना दिले जाणारे शेती साहित्य असो, हातपंपाची गाडी गावगाावात गेली, ग्रामसेवक गावात काम करतोय का? याकडे जातीने लक्ष घातलं, रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले, पाणी टंचाईच्या काळात सतर्क राहून काम केलं, पंचायत समिती मार्फत जे-जे कामे करता येतील ते-ते कामे मी माझ्या काळात केली. मात्र गेल्या दोन अडीच वर्षात पंचायत समिती माझ्याकडे नाही. आता तुम्हीच ग्रामीण भागातील लोकांना विचारा, बीड पंचायत समितीचा कारभार कसा आहे? गेल्या अडीच वर्षात बीड पंचायत समितीने काय केले?
चीत आलं तरी क्षीरसागर आणि पट आलं तरी क्षीरसागर,आता क्षीरसागरांना घरी बसवा असं विरोधक म्हणतात, दोन क्षीरसागरातला फरक काय?
लोक नक्कीच याबाबत चर्चा करत आहेत. मी क्षीरसागर आहे, या नावावर मला तुम्ही प्रमाणपत्र देणार आहात का? मला पंचायत समितीत संधी दिली मी काम करून दाखवलं आणखी संधी द्या दोन क्षीरसागरांमधला फरक तुम्हाला दिसून येईल. हे खरं आहे, स्थानिक आमदारांवर लोकांचा प्रचंड राग आहे. त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्यांना त्रासच दिला आहे. अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केला आहे. बीड मतदार संघाला अक्षरश: भकास करून टाकलं आहे. आज त्यांच्याकडे सर्व काही आहे , दाम आहे, दंड आहे आणि माझ्याकडे फक्त क्षीरसागर हे नावच राहिलं आहे. क्षीरसागरांकडे प्रस्थापित म्हणून पाहिलं जायचं. मी प्रस्थापित नाहीये, माझ्याकडे काकू-नानांचे आशिर्वाद, क्षीरसागर हे नाव, लोकांचे प्रेम एवढीच अनमोल धनसंपत्ती आहे. अडीच वर्षामध्ये ज्या काही निवडणूका झाल्या त्या निवडणूकीत आम्ही लोकांना विश्‍वास दिला. परंतू विद्यमान आमदार आणि त्यांचे लोक असं काही वागत राहिले की त्यामुळे साधे-साधे कामे रखडत राहिले. त्यांची ती सवय आहे, त्यांच्या या पद्धतीमुळे लोक आजही बोलतात. काकू-नानांची विचारधारा ही अखंड सामजाला सोबत घेवून जाणारी आहे. पुरोगामी विचाराची आहे. या लोकांनी पुरोगामी शब्द प्रयोग हा केवळ सत्तेसाठी वापरला. पुरोगामी विचारधारा ही फक्त खुर्चीसाठी वापरून घेतली. परंतू काकू-नानांच्या पुरोगामी विचार धारेचा वारसा मी पुढे नेणार आहे. या लोकांनी जरी पुरोगामी विचाराला हारताळ फासत सत्तेच्या उबेत राहणं पसंत केलं तरी.
मी दोन क्षीरसागरातला 
फरक विचारलाय? 
हो तेच सांगतोय ना, या लोकांच्या आशा वागण्यामुळेच आम्ही नगर पालिकेत आघाडीच्या माध्यमातून पॅनल टाकला. आम्ही पुरोगामी विचारावर ठाम होतोत. आमची आघाडी असली तरी पवार साहेबांसोबत आम्ही एकनिष्ठ होतोत. ती एक निष्ठता लोकांमध्येही दिसून येत होती. तेंव्हा ही आम्ही लोकांना हाच शब्द दिला होता. आघाडी जरी असली तरी आम्ही पवारांचेच आहोत, त्यांच्याच विचारधारेचे आहोत. निवडणूकीमध्ये आमचे नगरसेवक निवडूण आले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अल्पशा मताने पराभूत झाले. त्यानंतर आमच्याकडील जिल्हा परिषदेची सत्ता गेली, पंचायत समितीची सत्ता गेली. राज्यात आणि देशात भाजपाचं सरकार होतं. सत्तेची उब मिळवण्यासाठी आमंत्रण दिलं जात होतं. मात्र आम्ही सत्तेच्या उबेला भुललो नाहीत. पवार सााहेबांसोबत खंबीरपणे राहिलोत. परंतू या उलट त्यांचं बघा, मी क्षीरसागरातला फरक सांगतोय. आजपर्यंत ते कायम सत्तेत राहिले, पवार साहेबांनी त्यांना काय दिलं नाही? आमदार केलं, राज्यमंत्री केलं, कॅबिनेट मंत्र केलं, जिल्ह्यातून विरोध असतांना पालकमंत्री सुद्धा त्यांनाच केलं ना. मोठमोठ्या निधी दिल्या तेक कामं सुद्धा झाले नाहीत. आणि यांनी काय  केलं? राष्ट्रवादीची सत्ता गेली, सत्तेविना हे तडफडू लागले. उन्हाचे चटके यांना सहन होईनात. लागलीच त्यांनी भाजपाच्या व्यासपीठावर जायला सुरूवात केली. भाजप नेत्यांचे कार्यक्रम जाहिरपणे घेवू लागले. लगेच सत्तेत गेले, मंत्री पद घेतलं. आम्ही अभिमानाने सांगू , पंचायत समिती सोडली, जिल्हा परिषद सोडली, विचाराची परतारणा करणं ही काकू-नानांची शिकवण नाही. आम्ही लोकांसोबत राहिलोत, पवार साहेबांसोबत राहिलोत, विचार धारेसोबत राहिलोत, सत्तेसोबत गेला ेनाहीत आणि ते सत्तेसोबत गेले हा दोन क्षीरसागरातला फरक आहे. 
५० कोटीच्या आरोपावर अण्णा म्हणाले, पोरसोरांच्या प्रश्‍नावर उत्तर देत नाही? 
यावर बोलायचं आहे मला, पण योग्य वेळ आल्यावर बोलेल पण आत्ता नाही. 
तुमच्या हातातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दोन वेळा गेले याची खंत वाटते का? 
मुळीच नाही, माझ्यासाठी खुर्ची सर्वस्व नाही. लोकांचे काम आहे आणि पक्षश्रेष्ठीचा आदेश हे माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तेंव्हा आमचं घर एकत्र होतं. पक्ष श्रेष्ठींनी ऐनवेळी निर्णय घेतला. त्यादिवशी अध्यक्षपदाचा अर्ज एकच होता आणि तोही माझ्याकडे होता. तशा स्थितीत पक्षाने जे सांगितलं ते मी केलं. त्यावेळी कार्यकर्ते थोडे नाराज झाले, त्यांना समजावून सांगत सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सोबत घेवून मतदान केलं. मला पक्षाचे आदेश तेंव्हाही महत्त्वाचे होते आणि आजही आहेत. कारण मला महाराष्ट्राचा जानता राजा राजकारणातले भिष्माचार्य शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडायचं आहे. 
तुमचे नगरसेवक तुमच्या काकाकडे जात आहेत,तुम्ही कुठे कमी पडता? 
माझ्यासोबत काम करणारे तिकडे जात आहेत याचं दु:ख वाटत नाही पण त्या मुलांची काळजी वाटते. नगर पालिका निवडणूकीत मी त्यांना सोबत घेतलं. निवडूण आणलं, आत्तापर्यंत दोन-तीन त्यांच्याकडे गेलेत खरे तसे त्यांचे काल दोन नगरसेवक माझ्याकडेही आलेत, जाण्याबाबत माझं काहीही म्हणणं नाही. पण त्यांनी मला विचारायला हवं होतं, माझी चूक असेल तर ती दाखवून द्यायला हवी होती. बरं इथं नाही पण त्यांच्या व्यासपीठावरूनही बोलायला हवं होतं. परंतू तसं काहीच झालं नाही. बीड शहरातल्या सर्व लोकांना माहित आहे, त्यांना काय-काय अमिषे दाखवली आहेत. त्याबाबत उघडपणे बोललंही जात आहे. परंतू मी कुठे कमी पडलो असेल, चूक झाली असेल तर त्यांनी मला बोलायला हवं होतं. 
अशा पडझडीच्या परिस्थितीतत पवारांवर तुमचा ठाम विश्‍वास दिसतोय?
नक्कीच, साहेबांचं राजकारण हे समाजकारणाला जोडून नेणारं आहे. धनदांडग्यांपेक्षा सर्वसामान्यांना महत्त्व देणारं आहे. जात, पात, धर्म, पंताच्या पलीकडे आहे. पवार साहेब आजही सर्व क्षेत्रातलं मोठं विद्यापीठ आहे. आणि अशा विद्यापीठात माझी जडण-घडण घडते हे माझे मोठे भाग्य आहे. विश्‍वास हा विषय नंतरचा, आज मला आणि माझ्या राजकारणाला तेथूनच आकार मिळत आहे. 
मतदारांना काय आवाहन कराल?
बीडच्या आमदारांनी आत्तापर्यंत रस्त्यावर उतरून काम केलं नाही. त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आला. पण बीड शहरासह मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. विकास पुरूष ही बिरूदावली लावल्याने सत्य झाकता येत नाही. बीड मतदार संघाचे आज प्रचंड हाल आहेत. शहरात रस्ते नाहीत, पाणी नाहीत, नाल्या नाहीत, स्वच्छता नाही. लोकाहोमी ईमाने-इतबारे काम करील, लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मला आशिर्वाद द्या. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review