ताज्या बातम्या

वाढीव आरक्षण दिल्यास स्वागत, नाहीतर वंजारी  समाज सत्ताधार्‍यांशी टोकाचा संघर्ष करणार

वाढीव आरक्षण दिल्यास स्वागत, नाहीतर वंजारी 
समाज सत्ताधार्‍यांशी टोकाचा संघर्ष करणार
हा लढा कोणाच्याही विरोधात नसुन समाजाच्या हितासाठीच-वंजारी आरक्षण कृती समिती
बीड (रिपोर्टर):- राज्यातील वंजारी समाजाची सध्याची लोकसंख्या पाहता २ टक्क्यांवरून दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिले तर त्यांचे आम्ही स्वागतच करू, मात्र नाही दिले तर आमच्या हक्काच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांशी टोकाचा संघर्ष करण्यासही वंजारी समाज तयार आहे. याचाच एक भाग म्हणून दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बीड येथे वंजारी आरक्षण मोर्चा काढण्यात येणार आहे.  वाढीव आरक्षणाचा हा लढा कोणाच्याही विरोधात नसून समाजाच्या हिताचा आहे. या लढ्याचे नेतृत्व समाजातील प्रत्येक सदस्याकडे असणार आहे. 
यवन आक्रमणाला कंटाळून इसवीसनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थानमधून वंजारी समाज महाराष्ट्रात आला. समाजातील ८० टक्के नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये ही वंजारी समाजातील शेतकर्‍यांची 
संख्या मोठी आहे. बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून वंजारी समाज मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यासह पर राज्यांमध्ये ऊस तोडणीस जातो. वर्षानुवर्ष शेती आणि ऊस तोडणी करूनही समाजाची स्थिती बदललेली नाही. तसेच शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्‌या समाज मागासलेला आहे. समाजाला ओळख आणि एकजूट करण्याचे काम राष्ट्रसंत भगवान बाबा आणि त्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांनी केले. आजही वंजारी समाज स्व.मुंडे यांना दैवत मानतो. सन १९९२ पर्यंत राज्यामध्ये वंजारी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होता. त्यानंतर स्व.मुंडे यांच्या प्रयत्नामुळे ओबीसी मधून भटक्या विमुक्त जमाती प्रवर्गात समावेश करून वधवा आयोगाच्या शिफारशी वरून दोन टक्के आरक्षण (एन टी-ड) देण्यात आले. मात्र त्यास आता वीस ते पंचवीस वर्षे झाले असून राज्यांमध्ये वंजारी समाजाची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे समाजाला आता वाढीव आरक्षणाची गरज असून दोन टक्क्यांवरून १० टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने दिनांक २८ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता बीडमध्ये वंजारी आरक्षण मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि राज्यातील वंजारी समाजाच्या लोकप्रतिनिधींना समाजाच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने वाढीव आरक्षण दिले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, मात्र दिले नाही तर सत्ताधार्‍यांशी दोन हात करण्यासही वंजारी समाज तयार आहे. आमच्या मागण्यांचा राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. शिवाय वाढीव आरक्षणाचा लढा हा कोणाच्याही विरोधात नसून तो समाजाच्या हितासाठी आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटक वंजारी आरक्षण कृती समितीच्या सोबत आहेत. येणार्‍या काळात आरक्षण लढा आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या
दोन टक्क्यांवरून १० टक्के वाढीव आरक्षण द्यावे. जातनिहाय जनगणना करण्यात यावी.जिल्हास्तरावर वंजारी समाजाच्या मुलांसाठी शासकीय वस्तीगृह उभारावे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार यांना शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे.वंजारी समाजाच्या विकासासाठी कै.गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे. मागासवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुला प्रवर्ग मध्ये सर्व स्तरावरील शिक्षणाची व नोकरीची संधी पूर्ववत मिळावी.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review