ताज्या बातम्या

मुख्यमंत्री, आता कोणावर ३०२ दाखल करायचा?

मुख्यमंत्र्यांना पोलिसांचं कडं, शिवस्वराज्य यात्रेला मावळ्यांचं कडं -अमोल कोल्हे 

मुख्यमंत्री साहेब, हिम्मत असेल तर २२ मंत्र्यांची चौकशी करा

भागवत जाधव : गेवराई

शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रश्‍नी थेट मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, म्हणणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या पत्नी, आई आणि मुली स्वत:चे सरण रचत आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत. मग मुख्यमंत्री साहेब आता बोला, ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा जळजळीत सवाल विचारत खा. अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य आणि देशातील भाजपाच्या कार्यप्रणालीला आडेहात घेत भाजप आणि मुख्यमंत्री निव्वळ खोटारडे असल्याचे म्हटले.

   ते शिवराज्य यात्रेनिमित्त आयोजित अट्टल महाविद्यालय मैदानात आयोजित सभेमध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जयंत पाटील, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, अमोल मिटकरी, रुपाताई चाकणकर, महेबूब शेख, उषाताई दराडे, उमेश पाटील, भारती शेवाळे, अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, राजन पाटील, रविंद्र क्षीरसागर, भाऊसाहेब नाटकर, हेमाताई पिंपळे, दीपक वारंगे हे उपस्थित होते. पुढे बोलताना खा. अमोल कोल्हे म्हणाले की, आजचा तुमचा उत्साह पाहितला तर हा सळसळत्या तरुणाईचा उत्साह आहे. मुख्यमंत्री साहेब, डोळे उघडून बघा, शिवस्वराज्य यात्रेला कसा प्रतिसाद मिळत आहे. जनादेश यात्रेत मुख्यमंत्री फडणवीसांना पोलिसांचे कडे असते. शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे कडे आहे. रयतेचं राज्य आणण्यासाठी ही यात्रा असून तरुणांमध्ये लाथ मारील तिथे पाणी काढण्याची ताकत असते. सत्ता उलथवण्याची ताकत  असे. साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी राज्यातला तरुण एकवटला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज आणि त्या तरुणांनी जुल्मी राजवट उलथून टाकली. तरुणांनो तुम्हाला राज्यातली शिवसेना-भाजपची राजवट उलथवून टाकायची आहे. मुख्यमंत्र्यांना जिथे तिथे काळे झेंडे दाखवले जात आहे तर शिवस्वराज्य यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हाच तो राज्यातील जनतेमधला असंतोष, असं म्हणत अमोल कोल्हेंनी फडणवीस सरकारला आडेहात घेताना विद्यमान मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर शेतकर्‍यांच्या आत्महत्याप्रकरणी ३०२ चा गुन्हा दाखल करा, असे म्हणत होते. आता रोज पाच ते सहा आत्महत्या होत आहेत. मग आता कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा? असा सवाल करत तरुणांच्या कपाळावर बेरोजगारीचा शिक्का मारणार्‍या सरकारला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन अमोल कोल्हेंनी केले. आज देशात मंदीचे सावट आले असून कित्येक कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, याला फक्त भाजप सरकार जबाबदार असल्याचे सांगत भाजपाची गत म्हणजे ५६ इंचाची छाती आणि त्यांनाच  महाराष्ट्रात फिरण्याची भीती. अशी झाली आहे. भाजप सरकारला सत्तेचा माज चढल्याचे सांगत त्यांच्या या धोरणामुळे आता शिक्षकही आत्महत्या करू लागले आहेत. तरुणांना आता ताकत दाखवण्याची वेळ आली आहे. आजचा तुमचा उत्साह पाहता आणि खुर्ची उबवण्यापेक्षा जनतेत जावून बसणारा विजयसिंह पाहता, उद्याचा तुमचा आमदार हा विजयसिंह पंडितच असेल, असा विश्‍वासही अमोल कोल्हेंनी व्यक्त केला.

आरोप खोटे निघाले तर भर चौकात फाशी द्या -धनंजय मुंडे 

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला भ्रष्टाचाराची जत्रा’ म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेल्या पाच दिवसांपासून व्यासपीठावरून आव्हान देत आहेत. तुमच्या मंत्रिमंडळातील २२ मंत्र्यांनी ९० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तो जर खोटा असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या, परंतु चौकशी करा. आहे का हिम्मत ? होऊन जाऊ द्या एकदा, पाहु द्या एकदा उभ्या महाराष्ट्राला कोण भ्रष्टाचारी आहे? असे खुले आव्हानच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले. 
ते गेवराईच्या शिवस्वराज्य यात्रानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय, त्यांच्या जनादेश यात्रेतून म्हणतात, आम्ही एवढ्या विहिरी दिल्या, एवढे शेततळे दिले, मात्र प्रत्यक्षात ते दिसत नाहीत. जलयुक्त शिवार केल्यानंतर त्यात भरपूर पाणी मुरलं मग बोअर, विहीरला पाणी का लागत नाही? गेल्या वर्षी ५ कोटी तर यावर्षी ३३ कोटी वृक्षांची लागवड केली, असंही मुख्यमंत्री सांगतात मग हे पाहण्यासाठी काय भाजपाचा पुण्य कार्यकर्ता व्हावा लागतो की काय? मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा म्हणजे चालू मुख्यमंत्र्याची यात्रा होय. या पाच वर्षातही चालू मुख्यमंत्री होतो आणि पुढच्या पाच वर्षातही मी ‘चालू’ मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठीच ही यात्रा म्हणावी लागेल, असा खोचक टोलाही धनंजय मुंडेंनी या वेळी मारला. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण ऐकल्यानंतर ते राज्यातल्या बारा कोटी जनतेला खोटं बोलत असल्याचे दिसून येते. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना पक्षात घेऊन शुद्ध केले की काय. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावरून आव्हान देतो. तुमच्या २२ मंत्र्यांनी ९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे केले, त्यांची चौकशी करा, मात्र त्यांना क्लिन चीट देता. मी केलेले आरोप खोटे असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या, मात्र चौकशी करा. विनोद मंत्री तावडे म्हणतात, भगव्याला हात लावू नका, अरे ज्या माणसाने महापुरुषाच्या फोटोत पैसे खाल्ले त्या तावडेंची महापुरुषांच्या फोटोला हात लावण्याची लायकी नाही. आमच्या बहिणी ताई म्हणतात, धनंजय मुंडे बारामतीच्या दावणीला बांधले गेले. ताईसाहेब, तुम्ही जिल्ह्यातील जनतेला कोणाच्या दावणीला बांधत आहात ? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी ७२ हजाराची नोकरभरतीची घोषणा केली, ती भरती बाजुला ठेवून आता भाजपाची मेगा भरती सुरू आहे. राष्ट्रवादीने शेतकर्‍यांसाठी संघर्ष केला, गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात अनेक आंदोलने झाली, शेतकर्‍यांना संपावर जाण्याची वेळ आली ती या दळभद्री सरकारमुळेच. संपूर्ण देशाला फसवण्याचे काम आणि वेड्यात काढण्याचे काम भाजप करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी या वेळी म्हटले. आजचा उत्साह पाहता गेवराईचा पुढचा आमदार हे विजयसिंह पंडितच असतील, असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला 

    मुख्यमंत्री साहेब, गेवराईकरांचे पीटीआर आधी द्या, मग सभा घ्या ! -विजयसिंह पंडित

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित सभेत प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी स्थानिक आमदारांसह सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री साहेब, तुम्ही गेल्या अडीच वर्षांपूर्वी नगरपालिका निवडणुकीत गेवराईत प्रचारासाठी आले होते तेव्हा तुम्ही न.प.ची आचारसंहिता संपताच गेवराईकरांना अधिकृत पीटीआर देऊ, असे आश्‍वासन दिले होते मात्र या आश्‍वासनाला अडीच वर्ष होऊन गेले, आता गेवराईकरांना दिलेला पीटीआरचा शब्द पाळा. आधी पीटीआर द्या मगच सभा घ्या, असे विजयसिंह पंडित यांनी म्हटले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादीच्या पाठीशी -जयंत पाटील

       गेवराईमधील शिवस्वराज्य यात्रेत आज तुमचा विश्‍वास पाहितला तेव्हाच विजयसिंह पंडितांचा विजय निश्‍चित झाला. पंडित कुटुंब हे शरद पवारांच्या पाठीशी निषठेने आणि ताकतीने उभे आहे. ज्यांच्याकडे निष्ठा असते तोच जनतेसोबत इमानदार राहतो. लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशात भाजपाला पुन्हा यश आले हे पाहून देशात माणसे एका बाजुने आणि निकाल एका बाजुने दिसून आला. म्हणून देशातले सर्व पक्ष बळेट पेपरवर निवडणूक घ्या म्हणतात मात्र भाजप हा एकच पक्ष नको म्हणतो. नोटबंदी, जीएसटीने बेरोजगारीत मोठी वाढ झाली. देशात सर्वात मोठी मंदी मोदी सरकारच्या काळात आली. काही लोकांना मोठं करण्यासाठी भाजपा सरकार जनहिताची निर्णय बाजुला सारत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १८३ आश्‍वासने भाजपाने दिले मात्र १४८ आश्‍वासनांवर सरकार बोललेच नाही. ज्यांच्या मागे चौकशी चालू आहे ते पक्ष सोडून जात आहेत. पवार साहेबांनी २०-२० वर्षे ज्या लोकांना लाल दिवे दिले तेही पक्ष सोडून गेले आहेत. परंतु जे लोक भित्रे आहेत तेच लोक जात आहेत, आता राष्ट्रवादी पक्ष स्वच्छ झाला आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतात ते राष्ट्रवादीमध्ये एक निष्ठेने राहत आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review