महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन

महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन
बीड (रिपोर्टर):- पाटोदा येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी कोणतीही खातरजमा न करता बेकायदेशीररित्या तहसीलमधील तीन कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना  जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन देण्यास गेले असता जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता उद्धटपणाने त्यांना आपल्या कॅबिनमधून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून महसूल अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 
   पाटोदा येथील तहसीलदार रुपा चित्रक यांनी वाळू प्रकरणामध्ये खातरजमा न करता महसूल लिपीक, तलाठी आणि कोतवाल यांच्यावर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले. अवैध वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकाकडून दंडाची रक्कम चलनाद्वारे बँकेत न भरता स्वत:कडेच ठेवून घेतले. उलटपक्षी या प्रकरणात स्वत: दोषी असताना स्वत:चे प्रकरण बाजुला सारण्यासाठी वरील तीन कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल केले. याबाबत महसूल कर्मचारी संघटना काल सायंकाळी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांना भेटण्यास गेले असता पाण्डेय यांनी या कर्मचारी संघटनेला वेळ दिलाच नाही उलट त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही आणि उद्धटपणे वागून या कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाला कॅबिनमधून बाहेर काढले. याच्या निषेधार्थ आज सकाळपासून या महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत ठिय्या आंदोलन केले. यामध्ये संघटनेचे सुहास हजारे, चंद्रकांत जोगदंड, चौरे, शिक्षक संघटनेचे कदम, नागरगोजेसह महिला प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी या कर्मचारी संघटनेने या परिसरामध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर झाला. तलाठी संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे शेतकर्‍यांची पीक विमा भरण्याची कामे खोळंबली आहेत.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review