"विहिरीतल्या विद्युत पंपाची चोरी करायला गेला अन् पाय घसरून विहिरीत पडून मेला"

      काहींना लहानपणापासून चोरी- लबाडी करण्याची सवय लागलेली असते. आणि याच चोरी लबाडी मधूनच दैनंदिन जीवन जगण्याची काहींना कला अवगत झालेली असते. गुन्हेगारी कुटुंबात जन्म झाल्याने वयाप्रमाणे गुन्हा करण्याची सवय लागलेली असते. वय वाढले की, हिंमत वाढते. आणि मोठ्या गुन्ह्यांचे धाडसही निर्माण होते. व दिवसेंदिवस मोठे गुन्हे करण्याकडे गुन्हेगाराचे लक्ष जाते. आणि अशा या धाडसी गुन्हेगारीतून एक ना एक दिवस स्वतःच्या जीवनास मुकावे लागते. असेच विहिरीवरच्या विद्युत मोटारीची भर रात्री चोरी करायला गेला आणि पाय घसरल्याने विहिरीत पडून मेल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली. आणि सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसला.

          सदैव भटकत जीवन जगणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांना सदैव काही ना काही गुन्हे करून पोट भरण्याची सवय लागलेली असते. चोरी करून जीवन जगणे, चोरी करून पोट भरणे, हेच त्यांना दिवसेंदिवस सोपे वाटत जाते. आणि एक ना एक दिवस अशा या चोरी लबाडी च्या नादात त्यांना स्वतःच्या जीवाचीही परवा राहिलेली नसते. दिवसेंदिवस ते मोठे गुन्हे करण्यास माहीर बनतात. दिवस-रात्र न पाहता मोठे धाडसी निर्णय घेतात. कधी कधी तर भर रात्री केला जाणारा धाडशी गुन्हा मोठा अंगलट येतो. असेच एक शेतकऱ्याच्या विहिरीवरील रात्रीच्या वेळी विद्युत पंपाची चोरी करायला गेला, आणि आणि अचानक विहिरीत पाय घसरल्याने विहिरीत पडला. तेव्हा त्याला अवघड जागेवर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची सत्य घटना बीड जिल्ह्यात हातोळण च्या शिवारात घडली.

        बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आष्टी शहरापासून अहमदनगरच्या सीमेलगत खुंटेफळ हे एक छोटसं काही लोकसंख्येचा खेडेगाव आहे. हे खुंटेफळ जरी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असले तरी, त्यांना तिकडे अहमदनगर शहर जवळ असल्याने, या लोकांचा अहमदनगर शहराकडे जास्त कल वाढलेला असतो. आणि याच खुंटेफळ गावामध्ये एक पारधी समाजाची वस्ती वास्तव्यास होती. या पारधी वस्तीवर काळे आडनावाचे कुटुंब राहत होते. त्या पारधी कुटुंबाच छगन उर्फ महेमान लाजिम काळे व त्याची पत्नी मुले आणि छगनचाच लहान भाऊ तो ही त्याची पत्नी पाच मुली एक मुलगा असाच या दोन भावांचा परिवार खुंटेफळ याठिकाणी लहान मोठ्या चोर्‍या करत आणि कष्टही करून आपल्या संसाराचा ते उदरनिर्वाह भागवत मोठ्या आनंदात जगत होते.

       भटके समाजाचे जीवन अत्यंत विचित्र असते. त्यांना भटकंती केल्याशिवाय पोटाची खळगी भरत नाही. त्यामुळे असा असणारा हा विचित्र समाज भटकंतीच्या आणि पोट भरण्याच्या नादात स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा करत नाही. असे स्वतःच्या जीवाची पर्वा न केल्याने, आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने, छगन काळे याचा लहान भाऊ काही दिवसांपूर्वी आजारी पडला. त्याला आजाराने एवढे ग्रासित केले की, त्याच्या आजारावर कसल्याच प्रकारचा विलाज झाला नाही. शेवटी या आजारापासून तो वैतागून धरणीवर पडलेला होता. आणि आजारपणातच गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याने शेवटचा श्वास घेतला. आणि आपला दम सोडला. आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, पाच मुली, आणि एक मुलगा असा त्या मयताचा परिवार होता. त्याच्या दुःखद निधना नंतर त्याचा परिवार उघड्यावर पडला. मात्र या समाजात एखाद्या पत्नीच्या पतीचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या दिराकडे म्हणजे मयताच्या भावाकडे सोपवली जाते. त्यामुळे छगन काळे याच्या लहान भावाच्या दुःखद निधनानंतर त्याची पत्नी आणि सहा मुले यांना सांभाळण्याचा व मागेपुढे पाहण्याचा सर्वाधिकार छगन याच्याकडे आला. त्यांच्या समाजाचे रीतीरिवाजाप्रमाणे बंधूच्या कुटुंबाचा अधिकारही त्याच्याकडेच आला.

       पती वारल्यानंतर त्याच्या बंधूची पत्नी  छगन च्या ताब्यात दीड-दोन महिने राहिली त्यानंतर ती छगन कडे तिच्या माहेरी भावाच्या घरी जाण्याचा हट्ट करू लागली. त्यानंतर छगन तिला तिच्या माहेरी भावांकडे जाऊ देण्यास विरोध करू लागला. त्यानंतर तिने त्याच्या सोबत भांडणेही केली. यामधून तिच्या माहेरचे लोक आणि छगन यांच्यामध्ये पूर्वीही बऱ्याचदा भांडणे झालेली होती. त्यामुळे त्यांच्या ताब्यात असणाऱ्या बंधूच्या बायकोला तो तिच्या माहेरी जाऊ देत नव्हता. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाईकडे पाच मुली आणि एक मुलगा अशी सहा मुले होती. पारधी समाजात असाच नियम आहे कि, मुलीचे लग्न करायचे असेल तर तिच्या बापाला अगोदर चार लाख रुपये द्यायचे. त्यानंतर मुलीचे लग्न असा त्यांचा नियम असतो. त्यामुळे त्या मयत बंधूच्या बायकोकडे असणाऱ्या चार मुलींच्या लग्नानंतर छगनला सोळा लाख रुपये ₹ जमा होणार होते. यासाठी तो तिला तिच्या माहेरी जाऊ न देता येथेच आमच्या सोबतच राहा असे म्हणत तो तिला जाऊ देत नव्हता.

 छगन उर्फ महिमान लाजिम काळे याला पूर्वीपासून लहान-मोठ्या चोऱ्या करण्याचा छंदच लागला होता. तो सतत परिसरात अथवा राज्यात विविध ठिकाणी जायचा आणि छोट्या मोठ्या छुप्या चोर्‍या करून आणायचा. आणि त्यावर तो आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायचा. असेच एक दिवशी छगन काळे हा दिनांक 27 जून 2019 रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथून आष्टी पासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हातोळण हे ग्रामीण भागात एक खेडेगाव आहे. छगन उर्फ महिमान लाजिम काळे यांना काही दिवसापासून विहिरीवरच्या विद्युत पंपाच्या चोऱ्या करून त्या दूरवर नेऊन कमी जास्त पैशात विकण्याची, त्याला मोठी लालच निर्माण झालेली होती. आणि या लालसेपोटी छगन काळे यांनी आपल्या मामाची दोन मुले लोणी तालुका आष्टी येथील रोहित भोसले व अमोल भोसले यांच्याशी संपर्क साधला. आणि त्यांना चोरीच्या उद्देशाने बोलावून घेतले. चोरीसाठी कोठे जायचे? यावर त्यांची चर्चाही झाली. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्यांनी चोरीला जाण्याचे ठिकाण निश्चित केले. हातोळण शिवारातील एका विहिरीवरच्या विद्युत पंपाची चोरी करण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी त्यांनी दिवसा पाहणी केली होती.त्यानंतर चोरीचा ठिकाण आणि वेळ निश्च्चीत झाल्यानंतर ,दिनांक 27 जून रोजी छगन काळे यांनी लोणी येथील मामाचे दोन्ही मुले रोहित आणि अमोल यांना सोबत घेऊन, भर अर्ध्या रात्री आष्टी तालुक्यातील हातोळण च्या शिवारात प्रवेश केला. त्याठिकाणी काळोख अंधार पडलेला होता. रातकिडे किरकिरत होती. वनात पशुपक्षी विविध प्राणी गाढ झोपलेले होते. त्यांनी ठरवलेल्या प्रमाणे आजूबाजूचा सरावरा पहिला. आणि छगन अमोल रोहित हे तिघेही विद्युत पंपाच्या चोरीच्या उद्देशाने त्या विहिरीजवळ प्रवेश केला. रात्रीच्या वेळी हातोळण च्या शिवारात कोणीही नसते. त्यामुळे शिवारात सर्वत्र सुमसाम वातावरण झाले होते. आणि याचाच आपण फायदा उठवायचा, असा त्यांनी पक्का निर्धार केला होता. विहिरीच्या आत डोकावून पाहतात तर, विहीर कोरडीच होती पण अत्यंत खोल होती. तिघांनीही भर रात्री त्या विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला. तिघेही विहिरीच्या अर्ध्या पर्यंत पोचले. विद्युत पंप हा आत मध्ये सोडलेला होता. त्यांनी बराच प्रयत्न केला. पण विद्युत पंप जड व खोलवर असल्याने त्यांना बाहेर काढणे मुश्कील झाले. त्यानंतर मोठ्या हिमतीने छगन व रोहित अजून खोलवर जाऊन पंप बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले. आणि अमोल भोसले हा कोण येतय की काय, हे पाहत मोटर  घेण्याचा प्रयत्न करत, थोडा वरच थांबलेला होता. त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण जबर बांधलेली विद्युत मोटार तसेच जड असल्याने त्यांना सहजासहजी वर काढता येत नव्हती. त्यानंतर रोहित आणि मास्टर माईंड छगन याने आगळी वेगळीच ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्याचा पाय सटकला. आणि छगन विहिरीत कोसळला. त्याचबरोबर रोहितही विहिरीत घसरला. त्या दोघांनाही जबर मुक्का मार लागला. दोघांच्याही अंगावर जखमा झालेल्या होत्या. मात्र रोहित थोडा किरकोळ जखमी झालेला होता. छगन हा जसा अर्ध्या विहीरीतून खाली सटकला, तसाच त्याच्या अवघड जागेवर मार लागला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अमोल आणि रोहित यांनी त्याला हाक मारण्याचा आणि उठवण्याचा बराच प्रयत्न केला, मात्र त्याने कसलाच प्रतिसाद न देता तो जागीच मयत झालेला होता. त्यानंतर थोडा वर थांबलेला अमोल भोसले याने एक दोरी खाली सोडली. आणि दोरीच्या सहाय्याने रोहितला त्याने वर घेतले. आणि मयत छगन ला त्यांना वर घेता आलेच नाही. म्हणून छगन ला त्यांनी तिथेच पडून दिले. कसेबसे मोठ्या घाबरलेल्या अवस्थेत दोघेही विहिरीच्या वर आले. मात्र छगन ला बाहेर काढताच आले नसल्याने तो विहिरीतच पडून होता. आणि तेथून तात्काळ दोघांनी पळ काढला.

      त्यानंतर सकाळी एक  शेतकऱ्याच्या विहिरीत कोणीतरी खून करून एक प्रेत आणून टाकले अशी माहिती आष्टी तालुक्यातील आंभोरा पोलिस ठाण्यात मिळाली. त्यानंतर तात्काळ आंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, पीएसआय लोखंडे, पीएसआय धोत्रे, देवढे, अंग्रे, बोडखे, यांची टीम तात्काळ हातोळण शिवारात रवाना झाली. आणि काही वेळातच घटनास्थळी टीम दाखल झाली. तात्काळ पोलिसांनी काहींच्या मदतीने छगन काळे यांचे प्रेत काही वेळातच विहिरीतून बाहेर काढले. आणि सदर घटनेचा पंचनामा केला. आणि प्रेत शवविच्छेदनासाठी दिले.

         त्यानंतर आपला पती छगन काळे याचा त्याच्याच काही नातेवाईकांनी पूर्ववैमनस्यातून खून केला. आणि त्याला विहीरीत फेकले. असे गंभीर आरोप इतर कोणत्याही नातेवाईकांवर मयत छगन ची पत्नी करू लागली. प्रत्येक वेळी वेगळ्याच लोकांवर आरोप करताना ती दिसत होती. त्यानंतर सोबत असणारी मामाची दोन मुले अमोल आणि रोहित यांनी छगन च्या मृत्यूचे खरे रहस्य छगन ची पत्नी व इतर घरच्या मंडळींसमोर निम्या रात्री उघड केले. त्यानंतर घरच्या सर्वांना त्यांच्या मृत्यूचे कारण माहिती झाले. त्यानंतर घरच्यांनी एकत्र बसून हे प्रकरण आता कसे बनवायचे. आणि याच्या मृत्यूचा धब्बा आता दुसऱ्यावर कसा ठेवायचा, असा प्लॅन त्यांनी तयार  केला. आता मयत छगन च्या मयत लहान भावाच्या पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर माहेरी जाऊ दिले नाही. म्हणून तिच्या भावांनी छगन चा पूर्ववैमनस्यातून खून केल्याची पोलिसांना माहिती द्यायची असा बनाव छगन ची पत्नी आणि दोन भोसले बंधूनी रचला.

        माझ्या पतीचा खून झाला आहे असे म्हणत मयत छगन उर्फ महिमान काळे याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आंभोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 81/ 2019 कलम 302, 364, 201, 143, 147, 149. भादवि नुसार चिंगल्या भोसले व अन्य सात जण अशा आठ जणांवर छगनच्या  खुणाचा त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आंभोरा ठाण्याचे एपीआय ज्ञानेश्वर कुकलारे, यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. आणि आरोपीचा सर्वत्र शोधाशोध घेतला. आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी त्यांनी खबऱ्यांच्या नियुकत्या केल्या त्यानंतर पोलिसांनी चिगल्या भोसले याचा शोध शोध घेतला. असता चिंगल्या हा अहमदनगरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांच्या कानी आले. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या रुग्णालयात धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांना चिंगल्या भोसले दिसला. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन चिंगल्याला ताब्यात घेतले. व त्याची सखोल चौकशी केली असता, एक वेगळाच नाट्यमय प्रकार समोर आला. छगन काळे यांचा खून दिनांक 27 जून 2019 रोजी झाला अशी माहिती सर्वत्र पसरली होती. मात्र त्या रुग्णालयात चिंगल्या  हा दिनांक 25 पासूनच दाखल झालेला होता. त्याच्यावर अपेंडिक्स ची शस्त्रक्रिया झाली होती. सोबत त्याची पत्नी व मुले व इतर काही नातेवाईक तिथेच रुग्णालयात होते. मात्र तक्रारीत त्यानेच खून केल्याचे म्हटले होते. पण रुग्णालयातील रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आणि त्यानंतर त्या दिवशी चिंगल्या भोसले हा रुग्णालयातच असल्याचे दिसून आले. आले त्यानंतर छगन काळे याच्या पत्नीने दिलेली तक्रार खोटी असल्याचा पोलिसांना अंदाज आला. आणि सर्व रहस्य उघड होत गेले. त्यानंतर केलेल्या चौकशी दरम्यान रोहित भोसले आणि अमोल भोसले हे ही त्यात सामील असल्याची पोलिसांना माहिती मिळली त्यानंतर त्यांनी तात्काळ दोघांचा शोध घेतला, आणि दोघांनाही ताब्यात घेतले. आणि पुन्हा त्या दोघांना विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या घटनेला एक वेगळीच नाट्यमय वळण मिळाले. छगन काळे याचा झालेला तो खून नसून विद्युत मोटार चोरी करायला गेल्यानंतर विहिरीत पडून छगन याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर खोटी फिर्याद देऊन शासकीय कामाचा वेळ वाया घालवल्याने मयत छगन काळे याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

       सदर कामगिरी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि विभागीय पोलिस उपाधीक्षक लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या नेतृत्वात पीएसआय राहुल लोखंडे, पीएसआय सोहम धोत्रे, पोलीस नाईक प्रल्हाद देवढे, पोलीस कॉन्स्टेबल आंग्रे, पोलीस कॉन्स्टेबल आणय बोडखे, यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडली

प्रा सुनिल जाधव बीड 
दैनिक बीड रिपोर्टर 
मो ९८२२६३७९२८

अधिक माहिती: pro.sunil jadhav beed

Best Reader's Review