पाटोदा तहसीलच्या तीन कर्मचार्‍यांवर ४२० चा गुन्हा 

पाटोदा तहसीलच्या तीन कर्मचार्‍यांवर ४२० चा गुन्हा 
अव्वल कारकून, तलाठी, कोतवालाने केले होते वाळू माफियाशी साटेलोटे 
फिर्यादी झाले तहसीलदार, दोन वाळू माफियांवर गुन्हा
बीड (रिपोर्टर):- गेल्या सहा ते सात महिन्यांच्या कालखंडात वाळू गौण खनिजाची चोरी करून अनाधिकृतपणे सर्रास विक्री करून शासनाची आर्थिक हानीसह फसवणूक केल्या प्रकरणी पाटोदा तहसीलदाराच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी तीन महसूल कर्मचार्‍यांसह दोन ट्रॅक्टर धारकांवर गुन्हे दाखल केल्याने पाटोदा महसूल कर्मचार्‍यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अव्वल कारकुनासह तलाठी आणि कोतवालाचा समावेश आहे. हा गुन्हा आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान दाखल करण्यात आला.
   याबाबत अधिक असे की, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करांकडून गौण खनिजाची चोरी करून त्याची अनाधिकृतपणे सर्रास विक्री केली जाते. शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी करण्यात येते. या प्रकरणी सर्वस्तरातून ओरड झाल्यानंतर वाळू तस्करांना मदत करणार्‍या महसूल कर्मचारी यंत्रणेच्या रडारवर दिसून येतात. पावसाळी अधिवेशनात वाळुचा मुद्दा प्रचंड गाजला. या प्रकरणात एका तहसीलदारासह अन्य दोन अधिकार्‍यांचे निलंबन झाले. अशाच प्रकारची घटना पाटोदा तालुक्यात घडली आहे. तहसीलदार रुपा विठ्ठलराव चित्रक यांच्या फिर्यादीवरून तीन कर्मचार्‍यांसह पाच जणांवर आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ट्रॅक्टरधारक लहू रामभाऊ गुंड, संभाजी लहू गुंड यांनी वाळू गौणखनिज अनाधिकृतपणे विक्री करण्यासाठी चोरी करून दंडनिहाय रकमेचा शासनखाती भरणा न करता शासनाची फसवणूक करून आर्थीक हानी केली. तर पाटोदा तहसीलच्या अव्वल कारकून वैशाली पोले, तलाठी वैभव देशपांडे, कोतवाल राहुल गिरी या तीन कर्मचार्‍यांनी खोटे व चुकीचे दस्तऐवज तयार करून आर्थिक हानी केली. यामुळे तहसीलदार चित्रक यांच्या फिर्यादीवरून या पाच जणांविरोधात  कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, (३४) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा आज पहाटे साडेतीन वाजता पाटोदा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीआय सिद्धार्थ माने हे करत आहेत. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review