ताज्या बातम्या

बीडमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती

बीडमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती
गेल्या वर्षी झाले ५३१ अपघात, हेल्मेट नसल्याने झाले १४१ ठार, १५४ जखमी
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली खात्यापासून सुरुवात
कालपासून ५८ हेल्मेट न वापरणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना ठोठावला दंड
बीड (रिपोर्टर):- सरसलामत तर पगडी पच्चास अशी एक म्हण आहे. डोक्यावर हेल्मेट असेल तर माणुस अपघातातून वाचतो. २०१८ साली ५३१ अपघात झाले आहेत त्या अपघातांमध्ये हेल्मेट न वापरणारे १४१ जण मरण पावले तर हेल्मेट न वापरणारे १५४ जण जखमी झाले.  दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला असून जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आधी आपल्या कर्मचार्‍यांना हेल्मेटची सक्ती केली. गेल्या दोन दिवसामध्ये ५८ पोलीस कर्मचार्‍यांना दंड ठोठावण्यात आला. 
दुचाकीवर प्रवास करणार्‍या व्यक्तीने हेल्मेट वापरावे असे वाहतुकीचे नियम आहेत. मात्र या नियमाचे पालन वाहन धारक करत नाहीत. अपघात झाल्यानंतर हेल्मेट अभावी नागरीकांचा जीव जात आहे. हेल्मेट असेल तर अपघात झाला तरी यातून जीव वाचतो. २०१८ साली बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात झाले. यात हेल्मेट नसणारे १४१ जण ठार झाले. तर १५४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहन धारकांसाठी हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरीकांना हेल्मेटची सक्ती करण्यात येणार असून आधी याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनामध्ये करण्यात येणार आहे. ज्या पोलीस कर्मचार्‍याकडे हेल्मेट नाही त्या कर्मचार्‍यांना दंड आकारण्यात येत असून याबाबतच्या कारवाईला कालपासून सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दररोज अनेक पोलीस कर्मचारी येत असतात. या कर्मचार्‍याकडे हेल्मेट आहे का? याची पाहणी केली जात असून काल १८ तर आज ४० कर्मचारी हेल्मेट विना असल्याचे दिसून आल्यानंतर त्या सर्वांना दंड आकारण्यात आला आहे.

अधिक माहिती: beed reporter

Best Reader's Review