ताज्या बातम्या

ना. जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला प्रत्येक विभागाचा आढावा

ना. जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला प्रत्येक विभागाचा आढावा
शासकीय विश्रामगृहावर घेतली अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक
बीड (रिपोर्टर):- जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच बीड शहरामध्ये रात्री आले. आज सकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे विभागनिहाय अधिकार्‍यांची बैठक घेतली. बीड जिल्ह्यात सध्या सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चार्‍याची काय स्थिती आहे हेही क्षीरसागरांनी जाणून घेतले. आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी कुठल्या उपाययोजना आखता येतील याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. क्षीरसागरांच्या या बैठकीला सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
    जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार आणि फलोत्पादन खाते देण्यात आले. ना. क्षीरसागर हे रात्री बीड शहरामध्ये दाखल झाले. आज त्यांनी शासकीय विश्रामगृहावर सर्व विभागनिहाय अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात झाली. प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना बोलावून घेत त्या त्या विभागात कुठल्या समस्या आहेत याबाबतची माहिती जाणून घेतली. बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी भीषण दुष्काळ पडला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नसून पाण्याचा प्रश्‍न गंभीरच आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत किती ठिकाणी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे, किती छावण्या सुरू आहेत याबाबतची माहिती ना. क्षीरसागरांनी जाणून घेतली. खरीप हंगाम असल्याने बियाणे आणि खते किती उपलब्ध आहेत याची माहिती त्यांनी कृषी विभागाकडून घेतली. बियाणे आणि खतासाठी शेतकर्‍यांची हेळसांड होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी आजच्या बैठकीमध्ये संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांना दिल्या. रोजगारासाठी कुठल्या उपाययोजना आखता येतील, भविष्यात विकासाबाब काय नियोजन करता येईल यासह अन्य बाबींबाबत ना. क्षीरसागरांनी अधिकार्‍यांशी चर्चा करून काही सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. आजच्या या बैठकीला सर्वच विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 


जिल्ह्यातील पांदण रस्त्यांसाठी निधी उपल्ध करू -ना. क्षीरसागर
बीड जिल्ह्यामध्ये पांदण रस्त्यासाठी जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करू, असे आश्‍वासन रोजगार व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आजच्या या बैठकीत दिले आहे. या वेळी बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी धरमकर, प्रकाश आघाव पाटील, कृषि अधिकारी रविंद्र निकम, महावितरणचे संजय सरग, जि.प.चे सुनिल भोकरे, गणेश महाडीक यांच्यासह आदींची उपस्थिती होती. क्षीरसागरांनी शहरातील पाणी पुरवठ्याबाबतचाही आढावा घेतला. शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचीत केले. तसेच दुष्काळाबाबत विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होताना वीजपुरवठा उपलब्ध न झाल्याने पाणीपुरवठ्यामध्ये अडचणी येऊ नये यासाठी महावितरण मार्फत टँकर भरण्याच्या ठिकाणावर चोवीस तास वीजपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review