ताज्या बातम्या

जप्त केलेल्या वाळू वाहतुकीच्या  डिझेल खर्चातही अनेकांचे हात ओले 

जप्त केलेल्या वाळू वाहतुकीच्या 
डिझेल खर्चातही अनेकांचे हात ओले 
गेवराई (रिपोर्टर) : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईत प्रशासकीय पातळीवर जप्त केलेल्या वाळू व वाहतुकीत झालेल्या डिझेल खरेदीत गेवराईच्या महसूलमधील काही कर्मचार्‍यांनी हात ओले केल्याची जोरदार चर्चा सुरू असून याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
कधी नव्हे तर पहिल्यांदाच जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष वाळू माफियांच्या अंगावर हात घालून ३४३५ ब्रास वाळू साठे जप्त करत मोठी करवाई करून वाळु माफियांना घाम फोडला ही कारवाई तालुक्यातील राजापुर व परिसरात झाली होती. तर या ठिकाणी जप्त केलेली वाळू जाग्यावर मोकळी सोडून न देता जिल्हाधिकारी यांनी आयआरबी च्या अनेक हायवातुन भरून बीड व गेवराई येथील शासकीय कार्यालयात साठा केली. यामध्ये जवळपास बीड येथे १४९ खेपा तर गेवराईला ५३८ खेपा करून रात्र दिवस या वाळूची वाहतूक  केली होती. यासाठी प्रशासनाकडून संबंधित वाहनांना तलवाडा व गेवराई येथील पंपावरून डीझल पुरवठा करण्यात आला होता. यामध्ये जवळपास २१ लाख ४२ हजार रूपयाचे डिझल लागल्याचे खर्चात दाखवले असून या डीझल खरेदी मध्ये ही मोठा घोटाळा  असल्याची चर्चा सर्वत्र होत असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली असली तरी गेवराई तहसीलच्या कर्मचार्‍यांना मात्र चांगला मलिदा लाटण्याची संधी मिळाली असल्याचे दिसून येत आहे. कारण गाडी सोडण्यासाठी ७० हजार रुपयाची मागणी करणारा तहसील कार्यालयाचा लिपिक सुबोधकुमार जैन याला बुधवार दि. ५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जाळ्यात पकडल्याने आणखीच खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या कारवाई नंतर वाळू माफियांना मदत करणार्‍या हप्तेखोर अधिकारी व कर्मचार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मात्र या कारवाईतील वाळू वाहतुकीच्या डीझल खर्चात अनेकांचे हात ओले झाल्याची चर्चा असून याची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review