ताज्या बातम्या

राजकारणातील चमत्कार 

राजकारणातील चमत्कार 

राजकारण हे जादूच्या खेळासारखे झाले. कधी कोणाची लॉटरी लागेल आणि कधी कोणाचा गेम होईल हे सांगता येत नाही. तसा राजकारणात भरोसा राहिला नाही. निष्ठेला पुर्वी महत्व होतं. निष्ठावंताना न्याय ही मिळत होता. आज राजकारणातील निष्ठा दुर्मिळ झाली. जिकडं चलती तिकडं ओघ सुरु झाला. राज्यात पंधरा वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. हे पंधरा वर्ष भाजपा-शिवसेनेसाठी खुप कठीण गेले. सत्ता नसतांना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्ष कार्य करणं थांबवलं नाही. ज्यांना सत्तेच्या सावलीला जावं वाटलं ते मात्र उडून गेले. निष्ठावंत आहे त्याच पक्षात राहिले. मेहनतीला कधी ना कधी फळ मिळतं असं म्हणतात, त्या प्रमाणे भाजपाला यश मिळालं. महाराष्ट्र राज्यात भाजपाचा चौथा नंबर होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपा राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपाने शिवसेनेला मागं टाकलं. पुर्वी कॉंग्रेस नंबर एकवर होता. आज कॉंग्रेस नंबर चारवर आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागला. परवा राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. गेल्या एक वर्षापासून मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत होती. शेवटी विस्ताराला मुर्हूत सापडलं आणि एकदाचा विस्तार झाला. या विस्तारात काही चत्कारीक बाबी घडल्या. बाहेरुन आलेल्या राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर या दोन बड्या नेत्यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे. 
नाथाभाऊंचा कचरा झाला 
राजकारणातील सरस आणि अनुभवी म्हणुन एकनाथ खडसे याच्याकडे पाहितले जाते. गेल्या ४२ वर्षापासून ते राजकारणात आहेत. विशेष करुन ते भाजपाशी एकनिष्ठ आहेत. सत्तेच्या काळात त्यांना सत्तेचा लाभ मिळाला नाही हा राजकारणातील दुर्देवी प्रकार म्हणावा लागेल. २०१४ च्या मंत्रीमंडळात खडसे हे काही महिने मंत्री राहिले. त्यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. आरोप झालेल्या मंत्र्यामध्ये फक्त एकटे खडसेच नव्हते. अन्य काही मंत्री होते. मात्र बळी खडसे यांचा देण्यात आला. राजकारणात कधी कोणाची उंच उडी पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा खडसे राजकारणात सक्रीय होते. तेव्हा देेवेंद्र फडणवीस कुठेच नव्हते. विरोधकांची सत्ता असतांना खडसे यांनी आपल्या बालेकिल्लयात कमळ फुलवले हे विशेष आहे. खडसे यांनी आपल्या जिल्हयात पकड मजबूत ठेवली. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर खडसे हेच ज्येष्ठ आणि थोरले आहेत. मात्र २०१४ च्या विधानसभेच्या यशात खडसे मागे पडले. मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार्‍या खडसे यांचा त्यांच्याच पक्षाने कचरा केला. हे निष्ठावंताना दिलेले फळ म्हणायचं का? 
खडसेंचा संताप 
मंत्रीमंडळाच्या शेवटच्या विस्तारात खडसे यांचा विचार होईल असं अनेकांना वाटत होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. ज्यांचा कधी पक्षाशी संबंध आला नाही. त्या विखे यांना भाजपाने मानाचं स्थान देवून आपल्याच निष्ठावंताना पायदळी तुडवले. मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला. मंत्रीपदाबाबत आपल्याला तितका उत्साह राहिला नाही. पक्षाला आता निष्ठावंताची गरज राहिली नाही. आयारामाची गरज आहे. बाहेरचे लोक चांगला पक्ष वाढू शकतात. जे चार ते पाच वेळा निवडून आले त्यांना मंत्रीपद मिळत नाही निष्ठावंतावर अन्याय असल्याची सल त्यांनी बोलून दाखवली. खडसे सारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्षात किंमत नसेल तर इतरांचे काय? जी अवस्था केंद्रातील आडवाणीसह अन्य नेत्यांची झाली तीच अवस्था राज्यात खडसे यांची झाली. हा राजकारणातील बदलता खेळ समजायचा की बोलणार्‍यांना संपवण्याचा डाव म्हणायचा? 
मेटेंना डावलले
भाजपासोबत घटक पक्ष असलेला शिवसंग्राम आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने चार घटक पक्षांना सोबत घेतलं. सत्तेत वाटा देण्याच्या आणाभाका घेतल्या पण नंतर कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक, रिपाइ, रासपा यांना सत्तेत वाटा मिळाला. मात्र मेटे यांना डावण्यात आले. मेटे आणि बीडच्या भाजपात राजकीय वैर निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मेटे यांना भोगावा लागत असावा? यापुर्वी मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत मेटे यांची मंत्रीपदाबाबत चर्चा झाली होती. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. सत्तेची साडेचार वर्ष निघून गेली मेटे यांना मंत्रीपद मिळाले नाही. परवाच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात मेटेंची साधी चर्चा ही झाली नाही. रिपाईला राज्यमंत्रीपद देण्यात आले. रिपाईला आता पर्यंत राज्यात सत्तेत वाटा दिला नव्हता. शेवटच्या तीन महिन्यासाठी राज्यमंत्रीपद देवून रिपाईची बोळवण करण्यात आली. शिवसंग्रामला जाणीवपुर्वक डावल्याची भावना शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यात निर्माण झाली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मेटे नेमकी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. घटक पक्षाची किती परफट झाली हे मेटे यांच्यावरुन दिसून येऊ लागलं, हे मेटे यांच्याच बाबतीत घडलं हे विशेष आहे. मेटे यांनी बीडच्या राजकारणात जुळवून घेतलं नसल्यानेच त्यांची ही अवस्था झाली का? मेटेंचे तीन जिल्हा परिेषद सदस्य भाजपावाशी झाले. लोकसभा निवडणुकीत मेटे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठींबा दिला म्हणुनच मेटे यांना मंत्रीपदापासून दुर ठेवण्यात आले आहे का? 
आतून नाराजीचा सुर 
मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा अनेक वेळा झाली. अनेकांनी आपण मंत्री व्हावे यासाठी वाशिलेबाजी केली. मात्र अंतर्गत गटबाजी उफाळून येवू नये म्हणुन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवत नेला. निवडणुका येत्या काही महिन्यावर आलेल्या आहेत. परवा झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात ज्या नव्या मंत्र्यांना शपथ दिली गेली त्यांना फक्त तीनच महिने काम करण्याची संधी मिळणार आहे. शेवटच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात आपली वर्णी लागावी म्हणुन भाजपा आणि शिवसेनेतील अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र इच्छूकांच्या प्रयत्नांना यश आले नाही. विस्तारात नव्यानेच भाजपात आलेले विखे आणि शिवनेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना कॅबीनेट मंत्रीपद दिल्याने भाजपा आणि शिवसेनेतील निष्ठवंतांनी नाराजीचा सुर आवळला होता. आम्ही फक्त निष्ठा बाळगायची आणि पदे बाहेरहून आलेल्यांना द्यायची का? असं म्हणुन आपली नाराजी व्यक्त केली होती पण नाराजांची कसलीही दखल दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली नाही. भाजपाने विखेेंना आणि शिवसेनेने क्षीरसागर यांना मंत्रीपद दिले. आता क्षीरसागर आणि विखे आपल्या मतदार संघात पक्षवाढीसाठी किती काम करतात हे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीतून दिसेल.? प्रस्थापीत राजकारणाला कंटाळून अनेक कार्यकर्ते भाजपा-शिवसेनेशी जोडले गेले. विखे आणि क्षीरसागर हे आप-आपल्या जिल्हयातील प्रस्थापीत आहेत. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असतांना मंत्री राहिलेले आहेत. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना मंत्रीपद देण्यात आले. क्षीरसागर यांच्या रुपाने शिवसेनेला एक बडा नेता आणि शिक्षण सम्राट मिळाला आहे. या प्रस्थापीतांच्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किती न्याय मिळेल याचा विचार सामान्य कार्यकर्ते करत आहेत. 
विरोधीपक्ष नेता झाला मंत्री 
सत्तेसाठी काही पण हे वाक्य राजकारण्यांना लागून पडतं. कॉंग्रेस पक्षाने ठरावीक पुढार्‍यांना पोसण्याचं काम केलं. आता हेच ठरावीक बडे नेते स्वत:च राजकारण जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्या सपत्तीचा बचाव करण्यासाठी सत्ताधारी पक्षाची वाट धरु लागले. गेल्या पाच वर्षात अनेक विरोधकांच्या पाठीमागे सत्ताधार्‍यांनी चौकशीचा ससेमिरा लावलेला आहे. या चौकश्या आपल्याकडे येवू नये म्हणुन की काय विखे सारखे नेते भाजपात गेले. विखे तसे राज्यातील प्रस्थापीत राजकारणी आहेत. कॉंग्रेसचे ते विरोधीपक्ष नेते होते. विरोधात असतांना विखे यांनी आपली विरोधीपक्षनेतापदाची चुकून काही दाखवली नाही. ते फक्त नावाला विरोधी पक्ष नेते होते. स्वत:च्या मुलाच्या राजकारणाची सोय आणि आपल्याला मंत्रीपद हवं म्हणुन त्यांनी भाजपाचा सहारा घेतला. राज्याचा विरोधी पक्ष नेता सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो म्हणजे ही नवलाईच आहे. आज पर्यंत विखे सत्ताधार्‍यावर जे काही आरोप करत होते ते सगळेच खोटे होते असं समजायला काही हारकत नाही. कारण राजकारणात पक्षनिष्ठेला महत्व नाही. हे पुन्हा एकदा विखे यांच्या रुपाने राज्याला पहावयास मिळाले. 
पक्ष वाढवण्याचा सोपा मार्ग 
देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार आले. ते ही भरघोष मतांनी त्यामुळे विरोधकांचे अवसान गळाले. भाजपाला स्वातंत्र्यानंतर आता कुठं सत्तेचा लाभ मिळाला. पुर्वी तर देशात आणि राज्यात भाजपाचे फक्त बोटावर मोजण्या इतकेच सदस्य असायचे पण हे सदस्य सत्ताधार्‍यांशी निकराने लढायचे. आजच्या राजकारणाची अवस्था बिकट होवू लागली. सगळ्यांनाच सत्तेचा वाटा असावा वाटतो. विरोधात नको वाटतं. भाजपाचा विस्तार वाढत असल्याने या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा कल वाढला. काही स्वत:ला निष्ठावंत म्हणवणारे पक्ष बदलू लागले. विखे यांच्या नंतर अन्य काही कॉंग्रेसचे आमदार ही भाजपाच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादीचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यात किती तथ्य आहे हे त्यांनाच माहित? भाजपा कॉंग्रेस मुक्त करण्याची घोषणा करत आहे पण भाजपा आपला पक्ष वाढवण्यासाठी कॉंग्र्रेसचे नेते आपल्या पक्षात घेवून त्यांचे शुध्दीकरण करत आहेे. इतर पक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतल्याने पक्ष वाढत असतो की पक्षात धुसफुस वाढते याचा ज्याने-त्याने विचार करायला हवा. नव्यांना पायघड्या आणि जुन्यांना थांबा हा संदेश भाजपा आणि शिवसेनेचे नेते देत आहे म्हणजे हे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न खुपणारे आहे. येणार्‍या निवडणुकात जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपा-शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षाचे दार खुले केले. यात फक्त स्वार्थ दडलेला आहे सत्ताकारणाचा, मग तो भाजपा-शिवसेनेचा असो कि बाहेरुन येणार्‍या बंडोबाचा! त्यांना फक्त सत्ता हवी आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review