धर्मांधतेचे गाठोडे नको सत्याचे प्रयोग आणि प्रखर वक्ते व्हा

धर्मांधतेचे गाठोडे नको
सत्याचे प्रयोग आणि प्रखर वक्ते व्हा

गणेश सावंत
आम्ही नेहमी म्हणतो, अखंड विश्‍वात भारत देश हा विचाराने श्रीमंत आहे. अवघ्या जगातील देशांना भुगोल आहे. परंतु भारत देशाला भुगोलाबरोबर इतिहास आहे.  इतिहासाचा अक्षरश: खजिना आहे. विचारांची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेला लक्ष्य आणि धार आहे. परंतु त्या खजिन्याचे वारसदार आज दळभद्री दिसून येतात. कर्मदरिद्री आहेत, असे वाटायला लागते. इतिहासाच्या साक्षीने आणि इतिहासातल्या अनुभवाने शिकून पुढे जाण्यापेक्षा इतिहासातील थोर व्यक्तींना जातीच्या, धर्माच्या बंधनात अडकवण्याचा धंदा सध्या देशात तथाकथीतांनी सुरू केला आहे. कधी महात्मा गांधींना खलनायक ठरवायचं तर कधी सावरकरांना खलनायक ठरवून देशातील मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करायचे. गांधी आणि सावरकर हे दोघे या भूमीत जन्मले, ही भूमी खरचं भाग्यशाली आणि त्याच भूमीत तुमचा -आमचा जन्म झाला हे तुमचे-आमचे परम भाग्य. जसे कर्मदरिद्री तसे विचाराने दळभद्रीही आहोत की काय, असा जळजळीत सवाल आता विचारावासा वाटतो. महात्मा गांधींना ज्या पद्धतीने खलनायक ठरवून हिंदुवाद्यांनी सावरकरांचा जयघोष सुरू ठेवला आहे त्याप्रमाणेच सावरकरांना खलनायक ठरवून गांधींचा जयघोष करणारे कॉंग्रेसी आणि बंडखोर विचारसरणी आपले विचार पाजळीतच राहत आहेत. त्यांच्या या विचाराने गांधींची अथवा सावरकरांची उंची कमी होईल का? नाही ना! मग असे असताना या दोघांना सातत्याने खलनायक ठरवण्याचा खटाटोप कुठल्या हेतुने होतो हे आता आजच्या तरुण पिढीने समजून घ्यायला हवे. 
  गांधींचं सत्य आणि
  सावरकरांची भूमिका 

  पाहितली तर दोघांच्या विचारांचा अंत हा स्वातंत्र्य होता. दोघेही इंग्लंडमधून बॅरिस्टर झालेले होते. त्यांना पांढरतोंड्या इंग्रजांच्या कायद्याचा प्रचंड अभ्यास होता. या दोघांनीही देशासाठी आणि देशातील जनतेसाठी प्रयत्नांची परीकाष्टा केली. देशसेवा करताना या दोघांनी आपआपली भूमिका ठेवली. गांधींनी अहिंसेच्या भूमिकेत आपले काम सुरू ठेवले तर सावरकरांनी क्रांतीच्या आणि रोखठोक भूमिकेत आपले कार्य सुरू ठेवले. सावरकरानंी इंग्रजांची माफी मागितली म्हणून त्यांना खलनायक ठरवलं जातं. परंतु देशासाठी त्यांनी इतर कार्य केले त्याची दखल कोण घेणार आणि गांधींनी तर आपलं उभं आयुष्य देशासाठी खर्च केलं. देशासाठी छातीवर गोळ्या झेलल्या आणि गोळ्या घालणाराही कोण होता तर तोही इथल्याच मातीतला होता. तरीही गांधींना खलनायक ठरवण्याची भूमिका हिंदू महासभासह कट्टरवादी हिंदूंनी ठेवली. यापेक्षा दुर्दैव ते काय असेल. 
  गांधींनी सत्याचे प्रयोग
  तर सावरकरांचे निर्भिड बोलणे

  आजही ज्ञात आहेत. सावरकर सामाजिक प्रश्‍नावर अत्यंत परखड आणि कडक बोलायचे त्यांच्या एका निबंधात ‘जी जी वचने अजागळ बावळट आहेत, मग ती पुरानिय असोत, कुरानिय असोत, बायबली असोत ती वचने आजच्या विज्ञान युगात काढून टाकली पाहिजेत,‘ सावरकरांचे हे उद्गार आजच्या तथाकथीत सावरकरवाद्यांना तरी मान्य आहेत का? पुरानात जे-जे अजागळ बावळट असेल ते काढून टाकायचे या वाक्याने त्या वेळीही आणि आजही सनातनी मन पिसाळलेलेच होते आणि आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यापेक्षा पुढे जात सावरकरांनी ‘गाय ही देवता नाही, गोमाताही नाही, गाय हा एक पशू आहे,’ असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पत्नीचे श्राद्ध सुद्धा सावरकरांनी घातले नव्हते. सावरकरांचे शास्त्रोक्त परखड मते सावरकरवाद्यांना मान्य आहेत का? हे आता विचारावेच लागेल. मुठभर सावरकरवादी गांधींना खलनायक ठरवत असतील तर सावरकरांच्या विचारांचे ते अनुकरण करतायत का? सावरकर म्हणायचे, माझे कान धरण्याचा अधिकार फक्त शिवाजी महाराजांनाच आहे. तर दुसरीकडे गांधींचे सत्याचे प्रयोगही तितकेच निर्भिड म्हणावे लागतील. नंगा फकीर म्हणून ज्या माणसाकडे पाहितले जाते आणि ज्या गांधींच्या अहिंसेला जगभरात शस्त्र म्हणून संबोधलं जातं, विरांची अहिंसा म्हणून गौरवलं जातं त्या गांधींनाही खलनायक ठरवून हिंदूवाद्यांना नेमकं साध्य काय करायचं आहे? 
  नथूरामचे उदात्तिकरण 
  करणारे तथाकथीत हिंदूवादी आणि कर्मठांना आज संजय राऊतांनी आपल्या लेखातून जळजळीत सवाल केला आहे. ‘नथूरामने गांधीजी ऐवजी बॅरिस्टर जिनावर पिस्तूल चालवले असते तर देशाचा भूगोल आणि इतिहास बदलला असता? हा सवाल विचार करण्याजोगा आहे. जेंव्हा स्वातंत्र्यावर बोलताना सावरकर आणि गांधींना खलनायक ठरवणार्‍यांनी इ.स. १९०० चा इतिहास वाचायला पाहिजे, अनुभवयाला पाहिजे. आज त्या काळचे कोणीच जिवंत नाहीत, परंतु त्रुटक माहितीच्या आधारे कोणाला हिरो आणि कोणला झिरो करण्याचा प्रयत्न भुसकटांकडून होत असला तरी गांधींसारखे, सावरकरांसारखे हिमलायाच्या उंचीचे लोक अशा भुसकटांच्या आरोपांनी खुजे होणार नाहीत, परंतु देशातील नवतरुणांच्या वैचारिकतेची पातळी मात्र खुजी होईल. आम्ही सातत्याने म्हणतो, आम्ही कर्मदरिद्रय गांधींवर गोळ्या चालवणारा दहशतवादी हा मराठी मातीतला आणि मराठी माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असा दहशतवादी ठेचून काढला असता परंतु आजही नथूरामच्या विचाराने भारावलेल्या काही नतद्रष्ट शक्ती नथूरामचे उदात्तिकरण करतात हा देशद्रोहच म्हणावा लागेल. बॅरिस्टर जिनावर नथूरामने गोळ्या चालवल्या असत्या तर ते समजू शकलो असतो, कारण 
  बॅ. जिनाचे एक रहस्य
  त्या वेळेस अनेकांना माहित नव्हते. नसता आजही अखंड भारत राहिला असता. फाळणी झाली नसती. ते रहस्य एका फिल्मच्या पृष्ठ भागावर होते. काय होते ते रहस्य आणि ती फिल्म तरी काय होती. ती फिल्म म्हणजे एक्स-रे. माणसाच्या फुप्पुसाचा एक्स-रे. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता, अहंकारी आणि हटवादी म्हणून सुपरिचीत असलेला कायदेआझम बॅ. मोहम्मद अली जिना यांच्या फुप्पुसाचा तो एक्सरे होता. क्षयाने ग्रासलेला हा माणूस मृत्यूच्या अगदी जवळ होता. फाळणी झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी जिनांचा मृत्यू झाला होता. ज्याप्रमाणे  हे रहस्य फाळणीला जवाबदार असणार्‍या तेव्हाच्या इंग्रजी अधिकार्‍यांना माहित होतं ते रहस्य लॉर्ड लुई माउंटबेटन, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महत्मा गांधी यांना माहित असते तर ही फाळणी टाळता आली असती. हा इतिहास सांगण्यामागचे कारण एवढेच, तुम्हा-आम्हाला विचारांची मोठी देण आहे, श्रीमंती आहे, इतिहासाचा खजिना आहे, त्याचा सद्सद्विवेक बुद्धीने वापर करायला हवा. महापुरुषांना, क्रांतिकार्‍यांना, संत-महात्म्यांना जात-पात-धर्म, पंथात अडकवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या विचारांना निखळ खळखळ पाण्यासारखे वाहते ठेवे तर ते अधिक बरे होईल. परंतु इथं 
 धर्माचं गाठोडं 
  बांधण्यात जो तो पुढारलेला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं की ते फक्त मराठ्यांचे राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे, महात्मा ज्योतिबा फुले माळ्यांचे, सावरकर हिंदूंचे, लोकमान्य टिळक कट्टरवाद्यांचे, अण्णाभाऊ साठे मातंगाचे असे सर्व महापुरुष एका-एका जातीत बांधून ठेवण्याची कुचेष्टा कमदिमाखी लोकांकडून जेव्हा होते तेव्हा त्या लोकांच्या राज्याची आणि देशाची वाताहात झाल्याशिवाय राहत नाही. हा देश सुरुवातीपासून स्वातंत्र्याला आणि लोकशाहीला महत्त्व देणारा, प्राधान्य देणारा आहे. इथं रोमचा राजा निरो जन्मला येऊ शकला नाही, इथं हिटलरची पैदास जन्म घेऊ शकली नाही, कारण इथली मातीही सार्वभौम्य आहे. इथल्या हवांमध्ये, पाण्यामध्ये स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यच दिसून येते. जेव्हा-केव्हा देशावर पारतंत्र्य आलं तेव्हा तेव्हा हा देश एकवटला आणि एकवटण्यासाठी महापुरुषांबरोबर अहिंसावादी, क्रांतीकारी उभे राहिले हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही. म्हणून आजच्या पिढीने या महापुरुषांच्या, क्रांतीकार्‍यांच्या जाती शोधण्यापेक्षा, धर्म शोधण्यापेक्षा त्यांचे कर्तव्य-कर्म सागरासारखे अथांग आणि हिमालयाच्या उंचीचे हे मान्य करत त्यांच्या विचारांवर आपल्या आयुष्याचा आणि भविष्याचा अश्‍व दौडवावा. पुन्हा कोणाला जातीत विभागण्यापेक्षा, खलनायक ठरवण्यापेक्षा त्याच्या चांगल्या कला-गुणांना, कर्तृत्वाला स्वीकारावं. गांधी हे सर्वश्रेष्ठ होते, आहेत आणि राहतील. सावरकर हे देशासाठी लढले हेही तेवढेच सत्य आहे. यांना खलनायक ठरवण्यापेक्षा तुमच्या-आमच्या अंतरमनातला नालायकपणा बाजुला ठेवून या नायकांच्या कार्यप्रणालीला अंगीकारून नायक व्हा. 
 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review