पीकविमा न मिळाल्यास शिवसेना आपल्या  स्टाईलमध्ये मिळवून देईल -उद्धव ठाकरे 

पीकविमा न मिळाल्यास शिवसेना आपल्या 
स्टाईलमध्ये मिळवून देईल -उद्धव ठाकरे 
जालना (रिपोर्टर):- महाराष्ट्राचे आशिर्वाद घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर बसले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही सांगू शकतो की, ‘आम्हाला मदत हवी आहे’, कर्जमुक्ती ही प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहचली पाहिजे, हा शिवसेनेचा हट्ट असल्याचे सांगत औरंगाबादेत चंद्रकांत खैरेंचा पराभव हा माझा पराभव असल्याचे सांगून मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ते आज जालना जिल्ह्यात बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री अर्जून खोतकर, चंद्रकांत खैरे, आ. सुनिल प्रभू, आ. संजय सिरसट, आ. बालाजी किन्हीकर, आ. अजित चौधरी, बाळासाहेब अंबुरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकर्‍यांना पशू खाद्य वाटप करण्यात आले. 
साळेगाव येथील चारा छावणीला भेट देऊन उद्धव ठाकरेंनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. दुष्काळामुळे स्वागत समारोह या वेळी करण्यात आला नाही. मराठवाड्याचा दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळाशी लढणार असल्याचे या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठवाड्याच्या पाठीशी राहावे, असे म्हणत कर्जमुक्ती ही प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत पोहचली पाहिजे, हा शिवसेनेचा हट्ट आहे. पीक विमा योजना कुणालाही मिळालेली नाही. त्यातील अडथळे दूर झाले पाहिजेत. शेतकर्‍यांकडून पीक विम्याची सर्व माहिती गोळा करण्याचे आदेश या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. महाराष्ट्राचे आशिर्वाद घेऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर बसले आहेत त्यामुळे त्यांना आम्ही सांगू शकतो की, ‘आम्हाला मदत हवी आहे,’ शिवसेनेनेच पहिली कर्जमाफी केली होती. मागच्या सरकारने फक्त प्रकल्पाची स्वप्ने दाखविली मात्र आम्ही ती पूर्ण केल्याचेही त्यांनी म्हटले. शिवरायांचा महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करू, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी म्हटले. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review