ताज्या बातम्या

पाणी पेटलं, आनंदगावच्या ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा

पाणी पेटलं, आनंदगावच्या ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा
माजलगाव (रिपोर्टर):- मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळ पडल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई आहे. गावोगावी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. ज्याठिकाणी पाणीपुरवठा होत नाही, तेथील जनता रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. 
 माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे पाण्याची भीषण टंचाई असल्याने गावाला माजलगाव धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी अख्खं गाव रस्त्यावर उतरलं. ग्रामपंचायत कार्यालयावर गावकर्‍यांनी हंडा मोर्चा काढला. यात महिलांसह लहान मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. हा मोर्चा भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. 
बीड जिल्ह्यामध्ये जवळपास १३०० गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. ७०० पेक्षा जास्त टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई तीव्र होत आहे. ज्या गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही, तेथील लोक आता रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करू लागले. माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली. आतापर्यंत पाण्यासाठी अनेक योजना गावात राबवल्या मात्र त्या योजनेतून गावकर्‍यांना पाणी मिळाले नाही. गावाला माजलगाव धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करावा, या प्रमुख मागणीसाठी आज शेतकरी संघटनेचे गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अख्खं गाव सहभागी झाला होता. महिला, लहान मुलांसह वयोवृद्ध मोर्चात सहभागी झाले होते. प्रशसानाने याची दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा थावरे यांनी दिला. या वेळी सुनंदा थावरे, मीना थावरे, चंद्रकला दातार, मिना खळे, शांता खळे, राधा थावरे, रुक्मिण भारती, भागुबाई सरकटे, लता थावरे, आशा लता थावरे, नेहल वाव्हळकर, सखुबाई लांडगे, सीताराबाई थावरे, लक्ष्मी दातार, नंदा शेंडगे, वृंदावणी थावरे, मनिषा नखाते, इंदुबाई थावरे, शकुंतला थावरे, अर्चना थावरे यांच्यासह आदी महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आपल्या मागण्यांचे निवेदन ग्रामसेवक, सरपंच यांना देण्यात आले. 

अधिक माहिती: रिपोर्टर

Best Reader's Review