केजचा पाणीप्रश्‍न पेटणार  तहसीलदाराच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन


फिल्टर प्लान्टमधून टँकर भरणे बंद करा 
केज (रिपोर्टर):- धनेगावच्या धरणातून केज, धारूर नगरपालिकेसह बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. फिल्टर प्लान्टमधून टँकर भरण्याला मंजुरी दिल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडू लागली आहे. आज सकाळी तहसीलदाराच्या कार्यालयातच काही नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. 
   बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी तर नागरिकांनी पाण्यासाठी स्थलांतरही केले. अशा भयान अवस्थेत प्रशासकीय अधिकारी मात्र एसीमध्ये बसून खुर्च्या उबवण्याचे काम करत आहेत. धनेगावच्या धरणात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा असून या धरणातून केज, धारूर शहरासह बारा गावच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडू लागली आहे. सोनीजवळा येथील फिल्टर प्लान्टमधून दररोज टँकर भरले जातात. हेच टँकर तलावातून भरण्याचे आदेश प्रशासकीय अधिकारी का देत नाहीत? फिल्टर प्लान्टमधून टँकर भरले जात असल्याने केज शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. केजचा पाणीप्रश्‍न चांगलाच पेटला असून आज सकाळी न.प.चे गटनेते पशूपतीनाथ दांगट व उपाध्यक्ष दलिल इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत फिल्टर प्लान्टमधून टँकर भरणे बंद केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review