छावणीवर पाणी घेऊन जाणारे ट्रॅक्टर टँकर पलटले एकाचा जागीच मृत्यू, दुसरा जखमी 


बीड (रिपोर्टर):- चारा छावणीवरील जनावरांसाठी पाणी घेऊन जाणारे ट्रॅक्टरसह टँकर पुलाखाली जावून कोसळल्याने झालेल्या अपघातात टँकरखाली दबून एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजता बीड-पिंपळनेर रोडवरील ईट फाट्याजवळ घडली. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील लोकांनी टँकरखाली दबलेल्या दोघांना बाहेर काढले आणि तात्काळ रुग्णालयात हलवले. 
  याबाबत अधिक असे की, ईटवाडी येथील सोमनाथ बोंगाणे, श्रीराम बोंगाणे हे दोघे आज सकाळी चारा छावणीवर जनावरांना पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी घेऊन ते येत असताना त्यांचे टँकर गजानन सूत गिरणीजवळ आले, त्याठिकाणी चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर भरलेल्या टँकरसह रस्त्यावरील छोट्या पुलावरून खाली कोसळले. यामध्ये सोमनाथ बोंगाणे हा तरुण भरलेल्या टँकरखाली दबला गेला तर श्रीराम बोंगाणे हाही जखमी झाला. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरील अनेक वाहनचालकांनी आपले वाहने रस्त्याच्या कडेला उभे करून टँकरखाली दबलेल्या सोमनाथ बोंगाणे यास आसपासच्या लोकांच्या सहाय्याने बाहेर काढले. घटनास्थळीच सोमनाथ याची प्रकृती गंभीर असल्याचे दिसून आले. उपस्थित लोकांनी दोघा जखमींना तात्काळ बीड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र यातील सोमनाथ यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी बोंगाणे यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला होता. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review