ताज्या बातम्या

आचारसंहितेच्या कवचकुंडलात प्रशासन

आचारसंहितेच्या कवचकुंडलात प्रशासन
शासकीय/निमशासकीय कार्यालयातील कामे ठप्प, अधिकारी-कर्मचार्‍यांकडून आचारसंहितेचा बाऊ, दुष्काळी कामे ठप्प, जिल्ह्यात पाणीप्रश्‍न आवासून, अनेक चारा छावण्यांवर जनावरांची हेळसांड, मते मागून पुढारी, लोकप्रतिनिधी थंड हवेच्या ठिकाणी, जनता मात्र उन्हाळी वणव्यात
बीड (रिपोर्टर):- लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतरही बीड जिल्हा प्रशासन आचारसंहितेचा बाऊ करताना दिसून येत आहे. भर दुष्काळात सर्वसामान्य माणसांची कामे आचारसंहितेच्या नावाखाली शासकीय, निमशासकीय कार्यालयात ठप्प पडून आहेत. मतं मागणारे लोकप्रतिनिधी, पुढारी थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत असताना इकडे उन्हातान्हात गावागावांतील आणि वाडी-वस्ती-तांड्यावरील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपिटा कराव्या लागत आहेत. छावण्यांवर मनमानी सुरू असून शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आचारसंहितेचं नाव पुढे करत सर्वसामान्यांचं कुठलच का मकरायला तयार नाहीत. त्यांनी जणू स्वत:साठी आचारसंहितेचे कवचकुंडलच बनवून घेतल्याचे चित्र दुष्काळी जिल्ह्यातली भयावता तीव्रतेने समोर आणत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून देशभरात आचारसंहिता लागू आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सहा मतदारसंघात मतदान झाले, मात्र त्यानंतरही आचारसंहिता लागू असल्याने दुष्काळी बीड जिल्ह्यात कुठलेच काम करण्यास अधिकारी, कर्मचारी पुढे येत नसल्याचे दिसून येते. बीड जिचल्ह्यातील बहुतांशी तलाव हे कोरडेठाक पडले आहेत. बोटांवर मोजण्याइतक्याच तलावात एक दोन टक्के पाणी शिल्लक आहे, वाडी-वस्ती-तांड्यांवरील विहिर-बोअर आटले गेले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना भटकंती करावी लागत आहे, अनेक ठिकाणी टँकर कमी पडत आहेत. अशा वेळी प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे, परंतु अधिकारी-कर्मचारी आचारसंहितेचे नाव पुढे करून वेळ निभावून नेत आहेत. अन्य कामातही आचारसंहिता असल्याचे सांगत आहेत. आचारसंहितेचे कवचकुंडले पांघरुण सर्रासपणे सर्वसामान्यांच्या कामाकडे प्रशासन व्यवस्था दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे दुष्काळी कामंही ठप्प झाली आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि शेतात नापिकी झाल्याने अगोदरच त्रस्त असलेला कष्टकरी, शेतकरी, ऊसतोड कामगार आता ऊसताडणीहून परत आला आहे, त्याच्या हाताला कामाची नितांत गरज आहे, परंतु प्रशासन व्यवस्था आचारसंहितेचे नाव पुढे करत आहे. मराठवाड्यातल्या सहा जिल्ह्यात मतदान झाल्याने येथील आचारसंहिता शिथील करावी, अशी मागणी झाली असली तरी निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केेले आहे. बीड जिल्ह्यात यावर्षी शेकडोंवर छावण्या तालुक्या तालुक्यात उभारण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांशी छावण्यांवर जनावरांना पूर्ण चारा दिला जात नाही, काही ठिकाणी वाळलेली पाचट दिली जात असल्याची तक्रार येत आहे, मात्र या तक्रारीकडेही प्रशासन व्यवस्थादुर्लक्ष करत आहेत. एकूणच जिल्ह्यातली भयावह दुष्काळी परिस्थिती पाहता लोकांच्या मदतीला आता प्रशासनातील अधिकार्‍यांनी धावून जायला हवे. निवडणुकीत मते मागून थकलेले लोकप्रतिनिधी, पुढारी थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीवर गेले मात्र त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला वार्‍यावर सोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
००

अधिक माहिती: beed reporete

Best Reader's Review