ताज्या बातम्या

पहचान कोण? दाव्याचं काहुर, पारापारावर  एकच चर्चा ‘दबंग की बजरंग?’

पहचान कोण? दाव्याचं काहुर 
काल मतदान झाले, आज वाडी, वस्ती, तांड्यांसह गावागावात, पारापारावर  एकच चर्चा ‘दबंग की बजरंग?’
बीड (रिपोर्टर):- राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या बीड लोकसभा मतदारसंघात काल दुसर्‍या टप्प्यात मतदान झाले. विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत दिसून आली. मतदारांनी पहिल्या टप्प्यात स्फूर्त मतदान करत सायंकाळपर्यंत बीड जिल्ह्याचा मताचा टक्का ६७ पर्यंत नेऊन पोहचविला. मतदान झाल्यानंतर जिल्हाभरातील वाडी-वस्ती-तांड्यावर, पारापारावर आणि गावागावात ‘पहचान कौन?’, ‘कोण येणार’, ‘दबंग की बजरंग?’, इथं याला लिड, इथं त्याला लिड म्हणत आकडेमोड करणारे कार्यकर्ते पावलोपावली पहायला मिळाली. एक महिना हीच धाकधूक पहायला मिळणार असून निकालानंतरच यावरची चर्चा बंद होईल. मात्र सध्या तरी जिल्ह्यात प्रचंड चर्चेचं आणि दाव्यांचं काहुर दिसून येतं. 
  पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक राज्याचं लक्ष केंद्रित करून घेणारी ठरली. सुरुवातीला सत्ताधारी भाजपाकडून राष्ट्रवादी उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडे दुबळा उमेदवार म्हणून पाहण्यात आलं. मात्र उमेदवारीची घोषणा होताच अवघ्या दोन दिवसात जिल्हाभरात जय बजरंगचे नारे चालू झाले आणि भाजप हरकतमध्ये आली. जशीजशी ही निवडणूक पुढं जात होती तशी तशी रंजक आणि चुरशीची होवून बसली होती. राष्ट्रवादीकडून पक्षाचे सर्वासर्वे शरद पवार यांच्या दोन सभा आणि फौजीया खान, विद्या चव्हाण यांच्या प्रचार सभा व्यतिरीक्त अन्य कोणी सोनवणेंच्या प्रचारासाठी आलं नाही. सत्ताधारी भाजपाकडून प्रितम मुंडेंसाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, शाहनवाज हुसेन यांच्यासह अन्य मंत्री बीडमध्ये डेरेदाखल झाले होते. विकासाचा मुद्दा चर्चीला जात असतांनाच जातीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. मात्र जातीचा मुद्दा नेमका कोणी काढला? आणि तो चर्चेत कोणी आणला? हे अद्यापही सांगता आलेलं नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपाला छत्रपती शाहु महाराजांचे वंशज संभाजीराजेंना बीडमध्ये आणावं लागलं आणि दोन्ही राजांचा भाजपा उमेदवाराला पाठींबा हे सांगावं लागलं. त्या दुसर्‍यादिवशी उदयनराजे भोसलेंचं पत्र बीड जिल्ह्यात व्हायरल झालं आणि राष्ट्रवादीला पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा अटीतटीच्या लढतीत काल जिल्हाभरात अत्यंत शांततेत आणि तेवढ्याच उत्साहात मतदारांनी मतदान केलं. मताचा टक्का ६७ टक्क्यावर जावून पोहोचल्यानंतर आता निवडूण कोण येणार? यावर चर्चा आणि दावे ठिकठिकाणी करतांना दिसून येत आहेत. वाडी, वस्ती, तांड्यासह गावागावात आणि पारापारावर निवडूण कोण येणार यावर पैंजाही लावल्या जात आहेत. सट्टा बाजार मात्र बीडच्या उमेदवाराबाबत अनिर्णीत असल्याचे दिसून आले. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review