ताज्या बातम्या

बोला जिल्हावासियांनो, कोण पाहिजे? शेतकरी पुत्र बजरंगाची कमाल! की एकाधिकारशाहीच्या अहंकाराची धमाल!!

बोला जिल्हावासियांनो, कोण पाहिजे?
शेतकरी पुत्र बजरंगाची कमाल! की एकाधिकारशाहीच्या अहंकाराची धमाल!!

बँका समोरच्या रांगा कोण विसरणार? शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि आरक्षणासाठीचे बलिदान कसं विसरायचे ? शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर सत्ताधारी का बोलत नाहीत? पिक विम्याच्या पैशाचं काय झालं? बेरोजगारी वाढत आहे. तरण्याताठ्या पोरांचं लगीन होत नाही, बेरोजगारांचे टाळके हलले, आश्‍वासनाचे फवारे बस्स झाले. आता ‘जिथे सत्य तिथेच सत्ता’ बीड जिल्ह्यातल्या जनतेने घेतली भूमिका, लोकांनी निवडणूक हातात घेतल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली, विधानसभेच्या  लोकप्रतिनिधींना लोक म्हणून लागले, ‘तुमच्या वेळी पाहू, आता आमच्या अंतरमनातली हाक ऐकू, 

बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्राच्या राजकारणाला गवसणी घालणार्‍या बीड जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहत असून देशाच्या भवितव्याचा निर्णायक मोड अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने जिल्हाभरात मतदार सतर्क झाला आहे. तो जाहीरपणे, ‘बोला जिल्हावासियांनो, कोण पाहिजे? शेतकरी पुत्र बजरंगाची कमाल! की एकाधिकारशाहीच्या अहंकाराची धमाल!!’ असं म्हणत जो तो बँका समोरच्या रांगा कोण विसरणार? शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि आरक्षणासाठीचे बलिदान कसं विसरायचे ? शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर सत्ताधारी का बोलत नाहीत? पिक विम्याच्या पैशाचं काय झालं? बेरोजगारी वाढत आहे. तरण्याताठ्या पोरांचं लगीन होत नाही, बेरोजगारांचे टाळके हलले, आश्‍वासनाचे फवारे बस्स झाले. आता जिथे सत्य तिथेच सत्ता ही भूमिका जिल्ह्यातील जनतेने घेतल्याने सत्ताधारी भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपासाठी मतदान मागणार्‍या लाभधारकांसह लोकप्रतिनिधींना मतदारच आता ‘तुमच्या वेळी बघू, आता आमच्या अंत:करणातल्या आवाजाचं पाहू द्या,’ म्हणत एकाधिकारशाहीला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार जिल्हावासियांनी घेतल्याचे दिसून येते. 
   ‘खोटं बोल पण रेटून बोल’ हे ब्रीद असणार्‍या गल्ली ते दिल्लीतील भाजपाच्या बेगडया प्रेमावर आणि संस्कारावर बीह जिल्ह्यातील जनता तुटून पडल्याचे दिसून येत आहे. सातत्याने मागास म्हणून हिणवल्या जाणार्‍या बीड जिल्ह्याचे राजकारण प्रचंड संवेदनशील आहे आणि येथील जनता तितकीच स्वाभिमानी आहे. त्यामुळे कधी नव्हे ते यंदाची लोकसभा निवडणूक नेते आणि लोकप्रतिनिधींच्या मनावर नाही तर जनतेच्या हातात आहे. एकाधिकारशाही, हुकुमशाही आणि मी म्हणेन तेच खरे या अहंकाराला उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने बीड जिल्ह्यातला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, दिनदुबळा आणि अबालवृद्ध पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजपाकडून दाखवण्यात आलेले अच्छे दिनचे स्वप्न आश्‍वासनाचे फवारे आणि जात-पात-धर्म-पंथाचे राजकारण हे माणूस म्हणून जगणार्‍या सर्वसामान्यांचे टाळके हलवणारे आणि संताप आणणारे ठरल्याने जिथंतिथं भाजपाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी लोकांपुढे भाजपाचा उमेदवार दिल्लीत पाठवा म्हणून आवाहन करतात तेव्हा लोक त्या लोकप्रतिनिधींना बस्स झाला अहंकार, बस्स झाली हुकुमशाही आणि बस्स झाली एकाधिकारशाही, आम्ही तुमच्या वेळेस तुमच्या सोबत राहू, आता मात्र शेतकर्‍याच्या पुत्रालाच दिल्लीत पाठवू, असे स्पष्टपणे म्हणू लागल्याने विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदारांनाही गप्प बसावे लागत आहे. उद्याची निवडणूक ही अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि एकाधिकारशाहीला मूठमाती देण्याची असल्याने जिल्ह्यातला मतदार पेटून उठला आहे. स्व. मुंडेंच्या नावावर भाजप मत मागत असलं तरी भाजपाच्या नेतृत्वामध्ये मुंडें साहेबांसारखी सहानुभूती दिसून येत नाही. नेतृत्व कुठे सुख-दु:खात येत नाही, प्रेमाने कधी पाठीवर हात फेरत नाही की शब्दाने कधी गोड बोलत नाही, हा रागही सर्वसामान्य मतदारांसह त्यांच्याच कार्यकर्त्यात पहावयास मिळत आहे ही वस्तूस्थिती नाकारता येणारी नसल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना बीड जिल्ह्यात प्रचंड सहानुभूती आणि भाजप नेतृत्वावर प्रचंड रोष हाच जिल्ह्यातील जनतेचा एकजुटीचा मंत्र असल्याचे आता उघड होत आहे. जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीने भाजप प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसून येते. म्हणूनच जनताच आता ‘बोला जिल्हावसियांनो, कोण पाहिजे?,’ म्हणत सोनवणेंसाठी सकारात्मक साद घालत आहे. 


इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो 
बजरंगाचे शनिला साकडे 
दुष्काळाशी दोनहात करणार्‍या जिल्ह्यात कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याची शक्ती दे, सत्यासाठी, समतेसाठी, न्यायासाठी आवाज उठवण्याची ताकत दे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी शनिचे राक्षसभुवन येथील शनि महाराजांना ‘इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो,’ असे साकडे घातले. या वेळी उपस्थित कष्टकर्‍यांसह शेतकर्‍यांनी शनि महाराजांनी कौल दिल्याचे सांगत जिल्ह्यातली एकाधिकारशाही संपुष्टात येणारच असा विश्‍वास सोनवणेंना दिला. 


बीडमध्ये इतिहास घडला, मतदारांनीच घेतली निवडणूक हातात 
राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात इतिहासात प्रथमच लोकप्रतिनिधी, नेते यांच्या आवाहनापेक्षा बीड जिल्ह्यातील जनतेने अंतरमनातला आवाज ऐकला आहे. म्हणूनच जिल्हाभरातील वाडी, वस्ती, तांड्यासह गावागावांतील जनतेने लोकसभेची निवडणूक स्वत:च्या हातात  घेतल्याने सत्ताधार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या उमेदवाराला मतदान मागणार्‍या लोकप्रतिनिधींना मतदार थेटपणे ‘आम्ही तुमच्या वेळेस पाहू, आज आमचा निर्णय घेऊ,’ असं म्हणत असल्याने लोकप्रतिनिधी हताश झाले आहेत. 


उठा, एकीची मूठ बांधा, मतांचा टक्का वाढवा -माजी मंत्री प्रा.नवले
बीड लोकसभेसाठी उद्या मतदान होत आहे. जिल्ह्यातली आणि देशातली जुमलेबाजी आणि एकाधिकारशाही संपवण्यासाठी जिल्हावासियांनो उठा, एकीची मूठ बांधा, मताचा टक्का वाढवा, हुकुमशाहीसह जुमलेबाजी करणार्‍या, आश्‍वासनखोरांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन प्रा. सुरेश नवले यांनी केले आहे. 


चंद्रवाडीत आ.धस यांना रोखले
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी ग्रामपंचायतअंतर्गत चंद्रवाडी या गावात महिला व पुरुषांनी लोकसभेच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदार सुरेश धस यांना रोखले. या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील स्मशानभूमी, रस्ते, पाणी या मुलभूत समस्या न सोडवता केवळ दारू पिऊन आलेल्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा, या बाबीला वैतागलेल्या ग्रामस्थांनी विशेष करून महिलांनी आ. सुरेश धसांना ‘तुम्ही आम्हाला काही सांगू नका, आम्हाला कळते काय करायचे,’ असे सांगून परत पाठवले. 


गेवराई अस्वस्थच
पंडितमुक्तीचा नारा देणारे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचे काम चांगले असताना भाजपा नेतृत्वाने बदामराव पंडितांना सोबत घेतल्याने गेल्या काही महिन्यांपासून पवारांच्या कार्यकर्त्यात प्रचंड अस्वस्थता आहे, ती अद्याप कायम असून गेल्या दोन दिवसांपूर्वी नेतृत्वाची महत्त्वपूर्ण बैठक याच अंतर्गत तूतू मैमैमुळे रद्द झाली. 

माजलगावमध्ये चार गट
भाजपाच्या विद्यमान आमदाराला शह देण्याइतपत भाजपा पक्षानेच आयात वाढवली आणि तीच आता भाजपाला डोकेदुखी ठरू पाहत आहे. रमेश आडसकर, आर. टी. देशमुख, मोहनराव जगताप आणि सहाल चाऊस या चार नेत्यांचे इथे गट पडल्याने श्रेय कोण घेणार? हा प्रश्‍न समर्थकांत असल्याने तिथंही प्रचंड अस्वस्थता पहायला मिळते. 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review