ताज्या बातम्या

खाकाळ खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप


जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष होते
न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त 
बीड (रिपोर्टर):- ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून आष्टी तालुक्यातल्या केरूळ येथे झालेल्या रविंद्र उर्फ बाळु खाकाळ खून प्रकरणाची अंतिम सुनावणी काल पूर्ण झाल्यानंतर आज बीडच्या जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील पाच आरोपीतांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी वीस हजार दंडाची शिक्षा सुनावली. सदर खून खटला प्रचंड गाजलेला होता. कालपासून या निकालाकडे  आष्टी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून होतेे. त्यामुळे आज जिल्हा न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
याबाबत अधिक असे की, ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून ११ ऑक्टोबर २०११ रोजी आष्टी तालुक्यातील केरूळ येथे मोठा वाद झाला आणि यामध्ये तालुक्यातील खाकाळवाडी येथील रविंद्र उर्फ बाळु दशरथ खाकाळ यांची यात्रेत तलवारीचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेच्या आधी महिनाभरापुर्वी ग्रामपंचायत निवडणूकीत सचिन सुर्यवंशी व रविंद्र खाकाळ यांचे पॅनल आमने-सामने होते. या निवडणूकीत खाकाळ गटाचा विजय झाला होता. रविंद्र खाकाळ यांच्या पत्नी सरपंचपदी निवडल्या गेल्या होत्या. याच दरम्यान दोन गटातील वाद आष्टी पोलिसात जावून पोहाचला होता. तेंव्हा परस्पराविरोधात तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले होते. या दोन गटातील राजकीय वाद नंतर विकोपाला गेला. रविंद्र खाकाळ हे केरूळ येथे बहिणीच्या गावी टेंभी देवीच्या यात्रेला गेले होते. ११ ऑक्टोबर २०११ रोजी देवीचे दर्शन घेवून बहिणीच्या घराकडे जातांना जीपमधून आलेल्या मारेकर्‍यांनी रविंद्र यांच्यावर तलवारीने तब्बल २९ वार केले होते. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रविण गोंदकर यांच्या तक्रारीवरून सचिन सुर्यवंशी रा.केरूळ, नितीन कदम रा.जेजूर जि.सोलापूर, मोहम्मद गौसनूर रा.नगर, अशोक फल्ले, कृष्णा क्षीरसागर, महेंद्र महाजन रा.केरूळ यांच्यासह अनोळखी पाच जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. सुरूवातीला तत्कालीन पोलीस अधिक्षक ज्योती क्षीरसागर नंतर अप्पर अधिक्षक अखिलेश सिंह यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश दुसरे तथा अतिरीक्त सत्र न्यायमुर्ती ए.एस.गांधी यांच्यासमोर सोमवारी आरोपींना हजर केले. सरकारी पक्षातर्फे सतरा आरोपी आणि ३४ साक्षीदार तपासण्यात आले. आज न्यायालयाने या प्रकरणात आरोपी सचिन सुर्यवंशी, नितीन शिंदे, सय्यद गौस, भाऊसाहेब साबळे, महेेंद्र महाजन या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी २० हजार रूपयाचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम मयताच्या पत्नीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामध्ये अन्य बारा आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणी ऍड.सय्यद अझहर अली यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऍड.अझहर अली यांना ऍड.एस.बी.शेख, ऍड.सय्यद जोेहेब अली, ऍड.अरूण जगताप, ऍड.सय्यद असलम यांच्यासह ए.एस.आय डोंगरे, ए.एस.आय. शेख करीम यांनी सहकार्य केले. आजच्या निकालाकडे आष्टी तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून होते. न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review