ताज्या बातम्या

नेमून दिलेल्या कामावर आधी जा असं म्हणत केंद्रेकरांनी घेतली खातेप्रमुखांची बैठक

फोटो बंद, सीसीटीव्ही बंद, नेमून दिलेल्या कामावर आधी जा
असं म्हणत केंद्रेकरांनी घेतली खातेप्रमुखांची बैठक
बीड (रिपोर्टर):- फोटो काढणे बंद करा, सीसीटीव्हीही बंद करा, ज्यांना जी कामे नेमून दिलीत ती कामे करा, खातेप्रमुख सोडता बैठकीमध्ये कोणीही थांबू नका, लोकांच्या प्रश्‍नाला अधिक महत्त्व द्या, असे म्हणत विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांनी प्रशासकीय आढावा बैठक घेतली. दारबंद बैठकीत केंद्रेकरांनी बीडच्या जनतेचे प्रश्‍न समजून घेण्याच्या सूचना दिल्या. इथली जनता तेवढीच प्रेमळ आहे, इथले प्रश्‍न साधे आहेत परंतु ते सोडवणे गरजेचं आहे, असं उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले.
बीडचे तत्कालीन अधिकारी तथा विद्यमान विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आज प्रथमच बीड जिल्ह्याचा प्रशासकीय दौरा करत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आहेत. एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. त्यांच्या आढावा बैठकीतील प्रशासकीय रिहर्सल गेल्या आठ दिवसांपासून चालू होती. आजच्या बैठकीत केंद्रेकर यांनी पाणी टंचाई, चार्‍याची उपलब्धता, छावण्या, रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेली कामे, त्यातील रस्त्याची कामे किती, या रोजगार हमीच्या कामावर किती मजूर काम करतात, या सर्व प्रशासकीय बाबींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे. बीड जिल्ह्याचा त्यांना इतिहास आणि भुगोल माहित असल्यामुळे त्यांनी एका एका विभागाच्या कामकाजाला सुरुवात करत त्या खातेप्रमुखाला थर्ड डिग्रीपर्यंत झापले. बैठकीच्या सुरुवातीला निवडणूक निरीक्षक अणि जिल्हाधिकारी याबाबीची दोन मिनिटात माहिती घेऊन पोलिस विभागाची बैठक घेतली. पोलिस विभागाच्या बैठकीनंतर त्यांनी प्रशासकीय आढावा बैठकीला सुरुवात केली. पाणीटंचाई, चाराटंचाई, छावण्या या विषयांच्या खातेप्रमुखांना त्यांनी फैलावर घेतल्याचे कळते. या बैठकीला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी धरमकर, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकराी अभियंता यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. केंद्रेकर येणार म्हणून सुरुवातीपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून या सुरक्षेसाठी एक पोलिस उपविभागीय अधिकारी, दोन पोलिस निरीक्षक, पाच पोलिस उपनिरीक्षकांसह शेकडो पोलिसांचा बंदोबस्त होता. या वेळी शासकीय वाहन सोडता कोणत्याही वाहनाला आतमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review