शिवजयंती दिवशी शहरातून निघणार अभिवादन पालखी उर्दु शाळेचे विद्यार्थी घेणार रॅलीत सहभाग

शिवजयंती दिवशी शहरातून निघणार अभिवादन पालखी
उर्दु शाळेचे विद्यार्थी घेणार रॅलीत सहभाग; क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी दिल्या आज उर्दु शाळेंना भेटी
बीड (रिपोर्टर):- छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेबु्रवारी रोजी जयंती आहे. या जयंतीच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातुन अभिवादन पालखीचे आयोजन केलेले आहे. या पालखीमध्ये शहरातील उर्दु शाळेचे विद्यार्थीही विविध वेशभुषा घालून सहभागी होणार आहे. शाळेच्या सहभागासाठी आज मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. पालखीत जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील असे आश्‍वासन उर्दु शाळेच्या शिक्षकांनी दिले. 
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी असल्याने जयंतीच्या निमित्ताने मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने यावर्षी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे. छत्रपती शिवराय हे सगळ्यांचे होते. त्यांच्या जयंती निमित्ताने १९ तारखेला सकाळी ९ ते ११ या दरम्यान स्टेडियम ते शिवाजी महाराज पुतळापर्यंत अभिवादन पालखीचे आयोजन करण्यात आले असून या पालखीमध्ये शहरातील नागरीक, विद्यार्थी यांचा सहभाग राहणार असून यामध्ये उर्दु शाळेचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यानुषंगाने आज मराठा क्रांतीच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील काही उर्दु शाळेंना भेटी देवून त्यांना पालखीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. शिक्षकांनी निमंत्रण स्विकारत पालखीत सहभागी होण्याचे आश्‍वासन दिले. विविध वेशभुषा घालून उर्दु शाळेचे विद्यार्थी पालखीमध्ये सहभागी होणार असल्याचे मराठा क्रांतीचे अशोक हिंगे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्या समवेत सी.ए.जाधव, शेख शफीक, फारूक पटेल, नितीन धांडे, मुस्ताक अन्सारी, राहुल वायकर, शेख मुसा सर, अशोक सुखवसे, वकील सर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review