गेवराई शहरावर राहणार  आता तिसर्‍या डोळ्याची नजर


गेवराई (रिपोर्टर): पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या गेवराईत आता ‘तिसरा डोळा’ २४ तास नजर ठेवून असणार आहे. २८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून छेड़छाड़ तसेच चोर्‍या रोखण्यासाठी याची मोठी मदत मिळेल. शहरात सतत वादविवाद, मोबाईल चोरी, चेनचोरी, छेडछाड अशा गुन्हेप्रवृत्तीमुळे सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय गुन्हा नोंद झाल्यावर आरोपींचा छडा लावणे व त्यास शिक्षेपर्यंत पोहोचविताना पोलिसांचीही कसरत होते. त्यामुळे शहर सीसीटीव्हींच्या निगराणीखाली असणे गरजेचे आहे, असा गेवराई पोलिसांचा अभिप्राय होता. आ.ऍड . लक्ष्मण पवार यांनी जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करुन याकडे लक्ष वेधले होते . जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गेवराई शहरासाठी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्यातून २८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. धार्मिक स्थळे, मुख्य बाजारपेठ, शाळा महाविद्यालये, खासगी क्लासेस, वर्दळीची ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी २८ ठिकाणे पोलिसांच्या अभिप्रायासह निश्चित करण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे पोलिसांची डोकेदुखी कमी होणार असून शहरवासियांनाही शिस्त लागण्यास मदत होणार आहे. सध्या सीसीटीव्ही बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सुरू होणार आहेत.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review