मी वेळेवर येणारी विद्यार्थीनी -पंकजा मुंडे;चांगले विद्यार्थी कोण ? हे मार्कशीट आल्यावरच कळते. -धनंजय मुंडे

वाघमारे गुरुजींच्या अमृत महोत्सवात मुंडे भाऊ-बहिणींची जुगलबंदी

विरोधी पक्ष आधी बोलतो त्याला उत्तर सत्ताधारी देत असतो मात्र इथे उलटं झालं, कदाचित भविष्याची चाहुल लागली असावी -धनंजय मुंडे 

परळी (रिपोर्टर):- ‘मी एक चांगली विद्यार्थिनी आहे, म्हणून मी वेळेवर आले, असं म्हणत राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उशिरा आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. त्यावर धनंजय मुंडे यांनी पंकजांना उत्तर देताना ‘चांगले विद्यार्थी वेळेवर येतात व लवकर जातात, हे आज मला कळाले’ पण चांगले विद्यार्थी कोण ? हे मार्कशीट आल्यावरच कळते. बहुदा सत्ताधारी पक्षाला आता काम नसावे आणि विरोधी पक्षाचे काम वाढले असावे. यामुळे हा उशिर झालेला असावा आणि आता त्यांना विरोधी पक्षात बसायची चाहुल लागली असावी, असा चिमटाही त्यांनी या वेळी काढला. 
राज्याच्या राजकारणातले हे दोन मातब्बर काल परळी शहरात एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शहरातील साहित्यिक व शिक्षण क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात या भाऊ-बहिणींची जुगलबंदी रंगली होती. या वेळी व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव, प्रा. ह.म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ. सरोजिनीताई हालगे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी गुरुजींच्या ३६ वे पुस्तक ‘रुंजवण’ या मूल्यविचार संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गुरुजींवर निर्मित केलेली चित्रफिती या वेळी प्रेक्षकांना दाखविण्यात आली. त्याचबरोबर एका ब्लॉगचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. याच कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. ज्या वेळी गुरुजी बोलत होते त्या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हातात माईक धरून ठेवला होता. या कार्यक्रमात राज्याच्या राजकारणामध्ये धूरंधर असलेले राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एका व्यासपीठावर आले होते. पंकजा मुंडे लवकर आल्या आणि त्या भाषण करून गेल्या, या वेळी पंकजा यांनी ‘मी वेळेवर येणारी विद्यार्थीनी’ असल्याचा टोला धनंजय मुंडे यांना लगावला. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंहे म्हणाले, आधी विरोधी पक्ष बोलत असतो आणि त्याचे उत्तर सत्ताधारी देत असतो. मात्र इथे उलटे झाले आहे, कदाचित भविष्याची त्यांना चाहुल लागली असावी. चांगले विद्यार्थी वेळेवर येतात व लवकर जातात हे आता मला कळाले, पण चांगले विद्यार्थी कोण हे मार्कशीट आल्यावरच कळते, असाही चिमटा धनंजय मुंडे यांनी या वेळी घेतला. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review