मानवत रोडवर शेतकर्‍यांनी अडवला केंद्राच्या पथकाचा ताफा 


आमच्या भावना लक्षात घ्या, शेतकर्‍यांचा टाहो 
अधिकार्‍यांची भंबेरी, शेतकर्‍यांना कामे उपलब्ध करून द्या; पथकाचे आदेश 
परभणी (रिपोर्टर):- मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी कालपासून केंद्राचं पथक प्रत्येक जिल्ह्यात जावून वस्तूस्थिती पहात आहे. आज सकाळी हे पथक परभणी जिल्ह्यात डेरेदाखल झालं. सकाळी सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेताची पाहणी केली. या वेळी सोबत असणार्‍या अधिकार्‍यांना संबंधित पथकाने प्रश्‍नांचा भडीमार केला. त्या वेळी अधिकार्‍यांना उत्तर देता आलं नसल्याने पथकाने अधिकार्‍यांना झापझाप झापलं तर दुसरीकडे हे पथक रुडी गावाला जाणार होतं परंतु तेथील दौरा रद्द केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी साडेअकरा वाजता या पथकाचा ताफा मानवत रोडवर अडवला. शेतकर्‍यांच्या तीव्र भावना ऐकून या पथकाने दुपारी दीड वाजता जिल्ह्यातला दौरा आटोपता घेतला आणि पुढे ते बीड जिल्ह्यासाठी रवाना झाले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुष्काळ जाहीर करून महिना लोटून गेला मात्र दुष्काळावर उपाययोजना अद्याप सुरु झाल्या नाहीत. त्यात कालपासून केंद्राचं पथक दुष्काळ पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. आज सकाळी परभणी जिल्ह्यात दुष्काळ पाहणीला या पथकाने सुुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजता सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात कापसाच्या शेताची पाहणी केली. उपस्थित शेतकर्‍यांशी संवाद साधला. दुष्काळी उपाययोजनांबाबत झालेल्या चर्चेत महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांची पथकासमोर उत्तरे देताना भंबेरी उडाली. नरेगाची कामे उपलब्ध करून देणे हे तर दुरच जॉब कार्डच पुरेसे दिले नसल्याबद्दल पथकाने नाराजी व्यक्त केली. शेतजमीनीचे हेल्थ कार्ड शेतकर्‍यांना दिले नसल्याची बाबही समोर आली. स्थानिक अधिकार्‍यांमध्ये माहिती देण्यात समन्वय आढळून आला नसल्याचे दिसून आले. या वेळी पथकातील अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना तातडीने कामे उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. तिथून हे पथक पुढील दौर्‍यासाठी निघाले. पाहणी दौर्‍यात पेडगाव असताना अचानक पेडगावचा दौरा रद्द करण्यात आला. याची माहिती शेतकर्‍यांना होताच संतप्त शेतकर्‍यांनी आमच्या वेदना समजून घ्या, म्हणत मानवत रोडवर पथकाचा ताफा अडवला. गणेशपूर येथून हे पथक थेट रुडी या गावच्या शेतात पाहणीसाठी निघालं होतं. मानवत रोडवरील रेल्वे फाटक सचखंड एक्स्प्रेस आल्याने बंद होते. त्या वेळात फाटकावर पथकाची वाट पाहत असलेल्या शेतकर्‍यांना पथकाचा तफा दिसला आणि शेतकरी गाड्यांसमोर आडवे झाले. या वेळी संतप्त शेतकर्‍यांच्या भावना पथकातील अधिकार्‍यांनी समजून घेतल्या त्यानंतर या पथकाने पाहणी दौरा सुरु ठेवला. परभणीचा पाहणी दौरा दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान संपला आणि तिथून पुढे हे पथक बीडसाठी रवाना झाले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review