अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ परिसरात बिबट्याचे पुन्हा थैमान


दावणीला बांधलेली दोन जनावरे मारली
शेतकर्‍यात भितीचे वातावरण
अंबाजोगाई (सलिम गवळी):- अंबाजोगाई परिसरातल्या बुट्टेनाथ परिसरामध्ये बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला असून सर्वे नं. ६३६ या भागातील एका शेतातील दावणीला बांधलेली दोन जनावरे बिबट्याने मारल्याचे उघडकीस आल्याने या भागातील शेतकर्‍यांत भितीचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वीही अनेक वेळा जनावरे मारण्यात आली होती. या बिबट्याचा वन विभागाने अद्यापपर्यंत शोध घेतलेला नाही. 
बुट्टेनाथ परिसरात बिबट्या वावरत असल्याचा संशय या भागातील नागरिकांना आहे. काही दिवसांपूर्वी जनावरांचा फडशा पाडण्यात आला होता. सर्वे नं. ६३६ येथील बाबू जुम्मा पप्पूवाले यांच्या शेतातील दावणीला बांधलेल्या दोन गाई बिबटयाने मारल्याचे उघडकीस आले. नेहमीप्रमाणे सकाळी बाबू पप्पूवाले हे शेतात गेले असता त्यांना आपल्या दोन गाई मारून टाकल्याच्या अवस्थेत दिसून आल्या. या गाईंच्या अंगावर हिंस्त्र प्राण्याने पंजा मारलेल्या जखमा आढळून आल्या आहेत. या भागामध्ये बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळून आले. या बाबत वनपाल वरवटे यांच्याशी रिपोर्टरने संपर्क साधला असता ते म्हणाले की, परिसरातील नागरिकांनी घाबरू नये, सतर्क राहावे व बिबट्या कोणास आढळून आल्यास याची माहिती वनविभागाला तात्काळ कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review