आहेरवडगाव, जुजगव्हाण तापीने फणफणले; दोन्ही गावातील ७० ते ८० रुग्ण खासगी दवाखान्यात

चारपेक्षा जास्त लोकांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न
बीड (रिपोर्टर):- डेंग्यू, व्हायरल ताप, थंडी ताप यासारख्या आजारांनी बीड शहरासह ग्रामीण भागामध्ये थैमान घातलेले आहे. आहेरवडगाव येथे जवळपास ६० ते ७० जणांना ताप येत असल्याने त्यांच्यावर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर जुजगव्हाण येथेही अनेकजण तापीने फणफणत असल्याने चारपेक्षा जास्त लोकांना डेंग्यू झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले. घटनेची माहिती आरोग्य विभागाला झाल्यानंतर एका पथकाने गावाला भेट दिली असल्याचे सांगण्यात आले. 
गेल्या दोन महिन्यांपासून बीड शहरासह ग्रामीण भागात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, व्हायरल ताप, थंडी ताप यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूने आतापर्यंत जवळपास जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झालेला आहे. आजही शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये खचाखच भरलेले दिसून येत आहे. आहेरवडगाव येथील ६० ते ७० जणांना गेल्या आठ दिवसांपासून ताप येत असल्याने हे सर्व रुग्ण बीड शहरातील विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जुगव्हण येथेही अनेकांना ताप आला असून चार रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासणी अंती निष्पन्न झाले. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला झाल्यानंतर आरोग्य विभागाची एक टीम गावामध्ये गेली होती. शहरी भागासह ग्रामीण भागातील अस्वच्छतेमुळे डेंग्यूसारख्या आजाराची लागण होत आहे. 

कित्येक रुग्ण औरंगाबादच्या रुग्णालयात
तापीचे रुग्ण बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले असून बीड येथील डॉक्टरांना ताप आटोक्यात आणता न आल्याने येथील डॉक्टर रुग्ण औरंगाबादला पाठवतात. कित्येक रुग्णांवर औरंगाबादच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये डेंग्यू आणि पेशी कमी होणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. आरोग्य विभाग अजूनही सुस्तच असून शहरी भागासह ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review