लोका हो,कनकीचा उंडा खा, तांदळाच्या पाण्याचं सूप प्या

राशनवर साखर, डाळी अद्यापही आले नाही
जिल्ह्यात सकाळपासून पॉझ मशीनला रेंज नाही

बीड (रिपोर्टर):- मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून त्यातच दिवाळीचा सण दोन दिवसांवर आलेला आहे. सणासुदीच्या काळात तरी राशनवर धान्य उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात असतानाच अद्यापही तूर, चना, उडीद डाळीसह साखर राशनवर आलेली नव्हती. फक्त गहु आणि तांदुळच उपलब्ध आहे. हा माल उचलण्यासाठी आजपासून बीड जिल्ह्यातल्या पॉझ मशीनना रेंज येत नसल्याने कार्डधारकांत संताप व्यक्त केला जात होता. जिल्हाभरात २१२५ राशन दुकाना आहे. राशन दुकानांचा हा अनागोंदी कारभार नवीन नाही.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे. गोरगरीब जनतेला अगदी कमी दरामध्ये राशन उपलब्ध व्हावे यासाठी ठिकठिकाणी राशन दुकाने उभारण्यात आली. शहरामध्ये ५८ तर जिल्हाभरात २१२५ राशन दुकाना आहेत. राशन दुकानांवरचा हा अनागोंदी कारभार नवीन नाही. अनेक दुकानदार राशनचा माल काळ्या बाजारात विक्री करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. राशनचा हा काळा बाजार थांबवण्यासाठी शासनाने पॉझ मशीन उपलब्ध केलेल्या आहेत. प्रत्येक दुकानदाराला या मशीनची सक्ती करण्यात आली. दिवाळी दोन दिवसांवर आली असताना राशनवर संपूर्ण माल अजूनही उपलब्ध करण्यात आला नाही. राशनवर तूर, चना, डाळीसह साखर मिळेल अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. मात्र भरदिवाळीत डाळीसह साखर अद्याप एकाही राशन दुकानदाराकडे उपलब्ध नसल्याने शासनाची ही घोषणा फसवी आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुकानदाराने चलन भरले असल्याचे सांगण्यात आले मात्र त्यांना आजपर्यंत तरी हा माल उपलब्ध झालेला नव्हता. फक्त गहु आणि तांदुळ राशनवर आहे मात्र त्यालाही आज सकाळपासून पॉझ मशीनला रेंज नसल्याने कार्डधारक राशन दुकानदारांसमोर ठाण मांडून बसलेले होते. राशन दुकानांचा कारभार कसा अनागोंदी असतो हे यातून दिसून येत आहे. याबाबत पुरवठा अधिकार्‍याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, मी कामात आहे,’ असे म्हणून त्यांनी वेळ निभावून नेली.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review