पात्रूडमध्ये लाखोंचा गुटखा पकडला; अन्नभेसळचे अधिकारी झोपले 

पोलिसांच्या कारवाया सुरूच
माजलगाव (रिपोर्टर):- गुटखा माफियांविरोधात बीड जिल्हा पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असताना रोज लाखो रुपयांचा गुटखा परजिल्ह्यातून आणि परराज्यातून बीड जिल्ह्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. जालना जिल्ह्यातल्या परतूरमधून माजलगाव तालुक्यातल्या नित्रूड येथे आलेला गोवा, बाबा, विमल गुटखा गस्तीवर असलेल्या डीवायएसपी भाग्यश्री नवटके यांनी मध्यरात्री जप्त केला. एका टिपमुळे नवटके यांना ही कारवाई करता आली. १८ ते २१  गुटख्याचे भोत जप्त करण्यात आले असून याची माहिती अन्न व भेसळ विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली असून अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. दुपारपर्यंत आरोपींविरोधात गुन्हा दाखल होईल. 
बीड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा पोलिस दलाने पकडला. परंतु बंदी असलेल्या गुटख्याविरोधात ज्या अन्नभेसळच्या अधिकार्‍यांनी कारवाई करायला हवी ते अधिकारी बीड जिल्ह्यातल्या गुटखा माफियांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा धंदा होतो. गेल्या काही दिवसात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला आहे. रात्री माजलगाव तालुक्यात गुटखा माफियाविरोधात अशीच कारवाई करण्यात आली. डीवायएसपी भाग्यश्री नवटके ह्या गस्तीवर असताना त्या पात्रूडजवळ आल्या, त्यावेळी खबर्‍यामार्फत त्यांना पात्रूडमधील एका घराच्या कंपाउंडमधील शेडमध्ये गुटखा असल्याची माहिती मिळाली. नवटके यांनी आपल्या फौजफाट्यासह मोमीन नय्यूम याकुब हमीद यांच्या निवासस्थानी धडक मारून कंपाऊंडमधील खुल्या शेहमध्ये असलेले गोवा, बाबा, विमलच्या गुटख्यावर छापा मारला. याठिकाणी नव्हे दोन नव्हे तर तब्बल १८ ते २१ गुटख्याने भरलेले भोत पोलिसांना मिळून आले. तपासाअंती सदरचा गुटखा हा मोमीन मुस्तागी अब्दुल हमीद याचा असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. मिळून आलेला गुटख्याचा माल जप्त करून याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी अन्न व भेसळ अधिकार्‍यांना याची माहिती दिली. दुपारी बारा वाजेपर्यंत अन्नभेसळचा अधिकारी माजलगावमध्ये दाखल झालेला नव्हता. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू होती. रात्री एक वाजता गुटखा पकडल्यानंतरही बारा तास उलटून गेले तरी अन्नभेसळचे अधिकारी घटनास्थळावर जात नसल्याने अन्नभेसळ विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. 
०००

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review