महाराष्ट्राची राजभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका

सरकारच्या गुजराती आणि जियो प्रेमाचा धनंजय मुंडेंकडून धिक्कार 
बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने दुरदर्शनच्या मराठी सह्याद्री वाहिनीला डावलून गुजरातच्या ‘वंदे गुजरात’ वाहिनीची निवड करत आपलं गुजरात प्रेम दाखवून दिलं. या गुजरात प्रेमावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सडकून टिका केली. सरकारला गुजरातींचे इतके प्रेम असेल तर महाराष्ट्राची राजभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असं म्हणत सरकारच्या या गुजराती आणि जीयो प्रेमाचा धिक्कार असो, असं म्हणत निषेध व्यक्त केला. 
‘वंदे गुजरात’ ही वाहिनी महाराष्ट्रात दिसत नाही. त्यासाठी शाळेत डिश सेटबॉक्स बसवावा अन्यथा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी जियो टीव्ही ऍपमधील वंदे गुजरात वाहिनी बघावी, असे शिक्षकांना काढलेल्या आदेशात म्हटले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या खात्याने काढलेल्या या आदेशावर संतप्त होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज ट्विटद्वारे निषेध नोंदवला आहे. ते म्हणतात, महाराष्ट्रातील अभ्यासक्रमाच्या पुस्तकात गुजरातीचे धडे छापून झाले, आता मराठी शिक्षकांनाही गुजराती वाहिनीवरून धडे देण्याचा शासनाचा हा निर्णय म्हणजे सरकारचा महाराष्ट्राचे संपूर्ण गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा निषेधार्ह प्रकार आहे.  सरकारला गुजरातींचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राजभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असा उपरोधात्मक टोला लगावत मुंडे यांनी सरकारच्या गुजराती आणि जियो प्रेमाचा धिक्कार केला. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review