जिल्ह्यातील घरकुलच्या यादीचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू

३० सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान निवास घरकुल यादी अपडेट करण्याचे आदेश
बीड (रिपोर्टर):- लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना खुश करण्याचा विडा मोदी सरकारने उचलला असून त्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान निवास घरकुल योजनेचे यादीचे सर्वे करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित गावाला दुसर्‍या विभागाचे कर्मचारी देऊन या यादीतील माहिती ‘पंतप्रधान निवास योजना’ या ऍपवर ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित कर्मचार्‍यांनी घरकुल लाभार्थ्याची संपूर्ण माहिती अपडेट करण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह जिल्हा परिषदेला दिले आहेत. 
२०११ मध्ये केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक जनगणनेचा सर्वे केला आहे. या सर्वेनुसार प्रत्येक पंचायत समित्यांनी या जनगणनेचे बुकलेट तयार केलेले आहेत. या बुकलेटनुसार ग्रामसभेने पंतप्रधान निवास घरकुल ‘ड’ या योजनेचे लाभार्थी निवडून पंचायत समित्यांना कळविलेले आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने या योजनेतील घरकुलच्या लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती दुसर्‍या विभागाच्या कर्मचार्‍यामार्फत घ्यावयाची आहे. यामध्ये कृषि सहायक, इंजिनिअर, दुसर्‍या गावचा ग्रामसेवकसोबत संगणक ऑपरेटर यांच्या मदतीने संबंधित लाभार्थ्याची जीपीआरएस यंत्रणेवर माहिती अपलोड करणे, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते नंबर, आधार कार्ड, निवडणूक कार्ड नंबर यासह सर्व माहिती संकलित करून ही अद्यावत माहिती ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत पंतप्रधान निवास योजना या ऍपवरर ग्रामपंचायतीमध्येच भरावयाचे आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील बेघर लोकांना घरकुल मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review