ताज्या बातम्या

राजेंद्र मस्केंचा जय जयकार मेटेंना खटकला; शिवसंग्रामच्या सिंहाच्या जबड्यात राजेंद्र मस्के

बीड (रिपोर्टर):- ज्या सिंहाच्या छाव्याला स्वत:च्या पायावर उभा राहता येत नाही त्याला सिंहीन खावून टाकते आणि डरकाळी फोडून म्हणते ‘ज्याला स्वत:च्या पायावर उभा राहता येत नाही तो सिंहाचा छावा असूच शकत नाही,’ परंतु शिवसंग्रामसारख्या सिंहाचा लोगो वापरणार्‍या पक्षात मात्र स्वत:च्या पायावर उभा असलेल्या माणसांनाच सिंहाच्या जबड्यात घातलं जात असल्याचं उदाहरण राजेंद्र मस्केंना पदच्यूत करून दाखवून दिल्याने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. राजेंद्र मस्केंसारखा एकनिष्ठ आणि संघटना वाढवणारा कार्यकर्ता आमदार विनायक मेटेंना आजपर्यंत एकही मिळाला नाही हे उघड सत्य नाकारता येणार नाही, असे असले तरी केवळ राजेंद्र मस्के मोठे होत आहेत, संघटनेतील कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या नावाचा जयजयकार करत आहेत, म्हणून आणि म्हणूनच त्यांना पदच्यूत केलं जात असेल तर शिवसंग्राम ही संघटना एक व्यक्तीपूर्ती मर्यादीत राहील, अशा संतप्त प्रतिक्रिया आता कार्यकर्ते व्यक्त करताना दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम शिवसंग्रामचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी आ. विनायक मेटे हेही उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘बीडचा आमदार कैसा हो, राजेंद्र मस्के जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी आ. मेटेंनी घोषणा देणार्‍यांना ‘गद्दार’ म्हटले होते. इथूनच बहुदा मेटेंना आपल्या संघटनेत प्रदेशाध्यक्षपदावर असलेले मस्के खटकू लागले. खरं पाहिलं तर आपल्या पक्षाचा एखादा पदाधिकारी चर्चेत येतो, लोक त्याला डोक्यावर घेतात , त्याच्या नावाचा जय जयकार करतात, याचा अभिमान मेटेंना वाटायला हवा होता, परंतु हा व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा होतोय या भीतीपोटी की काय मेटेंनी मस्केंची धास्ती घेतली आणि काल मस्केंना विचारातही न घेता त्यांना पदच्यूत केलं. शिवसंग्रामचा आणि आ. विनायक मेटेंचा इतिहास पाहितला तर आजपर्यंत त्यांच्याकडे एकही कार्यकर्ता दिर्घकाळ टिकू शकला नाही, परंतु गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून राजेंद्र मस्के हे विनायक मेटेंसोबत खांद्याला खांदा लावून आहेत. बीड शहरासह मतदारसंघात आणि जिल्ह्यात शिवसंग्रामची ताकत त्यांनी वाढवली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवसंग्रामजवळ ज्या वेळी कोणी येत नव्हते, शिवसंग्राम सोडून जात होते त्या वेळी मेटेंना मस्के यांनीच खंबीर साथ दिली होती, परंतु संघटनेत केवळ मस्के मोठे होत आहेत, त्यांच्या नावाचा कार्यकर्ते जय जयकार करत आहेत आणि अन्य पक्षांचे वरिष्ठ नेते मस्केंना जवळ करू पाहत आहेत, एवढेच कारण मेटेंना खटकावे, म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धीच म्हणावे लागेल. आपला माणूस मोठा होत असेल तर त्याचा कोडकौतुक करणं महत्वाचं असतं, परंतु मेटेंनी असं न करता मेटेंना राजेंद्र मस्केंना पदच्यूत करून शिवसंग्राम हा एक व्यक्तीचा पक्ष असल्याचे दाखवून दिले. अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनीच दिल्या आहेत.

 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review